BIG BREAKING : भरधाव वाहन काळ बनून आले अन् अनर्थ घडला,या माजी आमदाराचा जागीच मृत्यू

आय मिरर
विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष, मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रा. तुकाराम बिडकर यांचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अपघाती निधन झाले.
या अपघाताचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. पाठीमागून काळ बनून मालवाहू भरधाव वाहन आले अन् पुढे भीषण अपघात घडल्याचे चित्रफितीमध्ये दिसत आहे. या अपघातात प्रा. तुकाराम बिडकर यांच्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला.
शिवणी विमानतळावर महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी तुकाराम बिडकर दुचाकी वाहनाने गेले होते. शिवणी विमानतळावरून परत येत असतांना शिवर गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीला मालवाहू वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील प्रा. तुकाराम बिडकर व त्यांचे सहकारी राजदत्त मानकर यांचा मृत्यू झाला.
हा भीषण अपघात पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या अपघाताची चित्रफित आता समाजमाध्यमातून प्रसारित झाली. मालवाहू वाहनाने (क्र. एमएच १२ पीक्यू २५१२) प्रा.तुकाराम बिडकर व त्यांचे सहकारी जात असलेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. मालवाहू वाहन अत्यंत वेगाने पळविल्या जात होते. त्या मालवाहू वाहनाने दुचाकीला पाठी मागून जोरदार धडक दिल्यावर पुढे जाऊन ते उलटले. दुचाकीसह त्यावरील दोघे रस्त्यावर जोरदार आदळत असल्याचे थरारक दृश्य चित्रफितीमध्ये दिसत आहे.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मालवाहू चालक मोहम्मद साहिल अब्दुल शाहिद (२५, रा. बडनेरा जि. अमरावती) याला अटक केली आहे. या मालवाहू वाहनातून जनावरांची वाहतूक करण्यात येत होती.
What's Your Reaction?






