चंद्रभागा गहिवरली ! ट्रकने चिरडलेल्या 6 महिलांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
आय मिरर
पंढरपूर- कराड रोडवर काल, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातातील सहा मृत महिला मजुरांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे कटफळ येथे अतिशय शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
आज शवविच्छेदनानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी हे सर्व मृतदेह गावातील ग्रामपंचायत सामोर ठेवण्यात आले होते. यावेळी या मृतांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी कटफळ येथे झाली होती . एकाच वेळी या सहा महिला मजुरांचे मृतदेह आणताच परिसरात एकच आक्रोश सुरु झाला. यानंतर अंत्यदर्शनासाठी याच ठिकाणी हे सर्व मृतदेह थोड्यावेळ ठेवण्यात आले होते. यानंतर एकापाठोपाठ एक सहा मृतदेहांच्या एकत्रित अंत्ययात्रेला सुरुवात झाली.एका पाठोपाठ एक अशा सहा अंत्ययात्रा पाहण्याची दुर्दैवी वेळ या परिसरावर पहिल्यांदाच आल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले होते.
बसची वाट पाहताना ट्रकची धडक दिल्याने 6 निष्पाप महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना पंढरपूर- कराड रोडवर काल, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. आज कटफळ गावाच्या कडेला असणाऱ्या स्मशानभूमीत या सर्व सहा महिलांवर एकच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान, या प्रकारास जबाबदार असणारा ट्रक चालक हा कराड तालुक्यातील असून त्याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
हा ट्रक चालक दारू पिला असाल्याचा संशय स्थानिकांना असल्याने पोलिसानी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले आहेत . कालच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाकडून मृताच्या नातेवाईकांना आताच मदत जाहीर करा म्हणून गोंधळ घालत रस्ता रोखून धरला होता . यावेळी ट्रक मालकाने मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यासह मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांचे समाधान झाले.
पंढरपूर- कराड रोडवर वाढते अपघात रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार स्पीड ब्रेकर बसवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यावर मृतदेह जागेवरून हलवू दिले होते. दरम्यान, या अपघातात जखमी असणाऱ्या एका महिलेवर पंढरपूर येथे उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र या अपघातानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
What's Your Reaction?