Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना दणका ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे राजीनामा देण्याचे आदेश ?

आय मिरर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. त्यांची हत्या कशी करण्यात आली याबाबत आपण आतापर्यंत ऐकलं होतं. या हत्येचे अत्यंत संतापजनक फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. संतोष देशमुख यांचे अतोनात हाल करण्यात आले, त्यांच्या सोबत सेल्फी मोडवर फोटो काढताना आरोपी दात काढून हसत होते, त्यांच्यावर लघुशंकाही करण्यात आली. या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर वरदहस्त असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे संतापजनक फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर आल्यावर काल (3 मार्च) रात्री उशिरा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील प्रचाराची आणि त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील कारभाराची सूत्रे हाताळत होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केवळ चर्चाच सुरु होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे भाग पडल्याची चर्चा आहे.
माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यात कैद झाला...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त करण्यात आले आहेत. आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त करण्यात आलेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसतायत. कपडे काढून संतोष देशमुखांच्या जीव जाईपर्यंत मारले, व्हिडिओ काढला आणि आनंद साजरा केल्याचं फोटोमधून दिसून येत आहे.
What's Your Reaction?






