Election दादा आणि बापूंच्या भूमिकेला ताईंचा पाठिंबा पण भाजप आणि शिंदे गटाचं बंड दादा करणार का थंड ? 

Apr 8, 2025 - 19:16
 0  1021
Election दादा आणि बापूंच्या भूमिकेला ताईंचा पाठिंबा पण भाजप आणि शिंदे गटाचं बंड दादा करणार का थंड ? 

आय मिरर

दोनच दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी एकत्र येत इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

खरंतर पृथ्वीराज जाचक हे अजित पवारांसोबत गेल्याने छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार पक्षाचं पॅनल असणार का? नेमकी पक्षाची भूमिका काय असणार ? याची सर्वांनाच उत्सुकता होते. अखेर सुप्रिया सुळे यांनी या भेटी मागचं कारण आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

आमची शेतकरी हिताची भूमिका आहे.जाचक कुटुंबाशी कौटुंबिक संबध आहेत. छत्रपती साखर कारखाना बाबत पृथ्वीराज जाचक नेतृत्व करणार असतील तर आमची ही तीच इच्छा आहे. आणि बाकीचे पक्षही असंच म्हणत असतील तर मग राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करण्याची इच्छा असेल तर ही गोड बातमी आहे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे त्यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. 

तर या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचं पृथ्वीराज जाचक यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. हा दौरा पूर्वनियोजित होता चार दिवसापूर्वी हा दौरा ठरला होता. सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्याची कल्पना उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील आहे. पवारांचं संपूर्ण कुटुंब या कारखान्याच्या संस्थेत उभारणीत कार्यरत होते. त्यामुळे या कारखान्या विषयी पवार कुटुंबियांना आस्था आहे. कारखाना म्हणजे सर्व शेतकऱ्यांचा प्रपंच असतो. यासाठीच त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे.

अर्थात सुप्रिया सुळे यांनी जरी पाठिंबा जाहीर केला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्णयाला महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र विरोध दर्शवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या निवडणुकीबाबत भवानीनगर येथील सर्वपक्षीय शेतकरी कृती समितीच्या मेळाव्यात भूमिका मांडल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी आणि शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी मात्र कारखान्याची निवडणूक लढवण्याच जाहीर केल आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे हे बंड अजित पवार थंड करणार का असाही प्रश्न उपस्थित झालाय.

ही लोकशाही आहे ज्याला उमेदवारी दाखल करायचे आहे त्याला आपण उमेदवारी दाखल करू नका असं सांगू शकत नाही पण या संस्थेत प्रत्येक जण चेअरमन आहे प्रत्येक जण संचालक आहे. सध्या अडचणीत असणारी संस्था बाहेर काढणे गरजेचे आहे.

भाजपची देखील काही लोक आमच्याबरोबर आहेत सेनेची देखील काही लोक आमच्या बरोबर आहेत असा दावाही पृथ्वीराज जाचक यांनी केला आहे. भवानीनगर येथे झालेला मेळावा हा सर्वपक्षीय होता कोणालाही येण्यास बंधन केलं नव्हतं जो येईल त्याचा आम्ही स्वागतच करणार होतो. शेवटी श्री छत्रपती कारखाना वाचला पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे असेही पृथ्वीराज जाचक यांनी स्पष्ट केला आहे. ज्यांनी विरोध दर्शवला त्यांना मेळाव्याला यायला कोणीही अडवलं नव्हतं असेही ते म्हणाले.

मी 22 वर्षे या कारखान्यासाठी वेळोवेळी काही सूचना केल्या. आज निवडणूक आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत पण संस्थेचं काय ? त्यामुळे सर्व वैयक्तिक हेवे दावे बाजूला ठेवून ही संस्था वाचवली पाहिजे असं आवाहन पृथ्वीराज जाचक यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow