Chhagan Bhujbal : भुजबळांनी थेट 'राजीनामास्त्र' उपसताच शिंदे, फडणवीस, दादा काय म्हणाले
आय मिरर
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे विषयावर टांगली गेली असतानाच आता मराठा आणि ओबीसी असा उभा संघर्ष राज्यामध्ये पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर त्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध करण्याचं काम मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.
मात्र, मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री असून घेतलेल्या भूमिकेमुळे एकंदरीतच मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सहकारी मंत्र्यांकडूनही छगन भुजबळ यांनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, आता थेट छगन भुजबळ यांनीच आज (3 फेब्रुवारी) अहमदनगरमधील ओबीसी रॅलीमध्ये 16 नोव्हेंबर रोजीच राजीनामा दिल्याचे सांगताना अडीच ते तीन महिने गप्प होतो, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
भुजबळ यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती
इतकंच नव्हे तर भुजबळ यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती आहे. या संदर्भात एबीपी माझाने सुद्धा वृत्त दिले होते. आता या वृत्तावर छगन भुजबळ यांनीच अहमदनगरमधील रॅलीमध्ये शिक्कामोर्तब केलं आहे. 16 नोव्हेंबर रोजी छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. भुजबळ यांनी राजीनामा दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये 18 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती.
या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांना राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. तसेच तिन्ही मंत्र्यांकडून राजीनामा देऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. त्यांनी राजीनामा दिल्यास मंत्रिमंडळासाठी योग्य ठरणार नाही, त्याचबरोबर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत त्यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन सुद्धा करण्यात आले होते.
समाजासाठी मी आमदारकीचा देखील राजीनामा देईन
याच बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी राजीनामा माध्यमांमध्ये सांगणार नसल्याचे कबूल केले होते. मात्र, राजीनामा मागे घेतला नव्हता. छगन भुजबळ यांनी दिलेला राजीनामा अजूनही एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 16 नोव्हेंबरला राजीनामा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे भुजबळ यांनी पाठवला होता. मात्र, तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वीकारला गेला नाही. समाजासाठी मी आमदारकीचा देखील राजीनामा देईन अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली होती. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी अधिसूचनेचा मसुदा जारी करण्यात आला आहे त्या विरोधात आणि सरकारच्या एकंदरीत विरोधात भुजबळ आजही आक्रमक आहेत.
What's Your Reaction?