स्त्री सन्मानाचा परमोच्च आदर्शबिंदू म्हणजे छत्रपती शिवराय !
आय मिरर लेखिका - स्वाती लोंढे-चव्हाण,टेंभुर्णी (लेखिका भारतीय संविधान अभ्यासक असून ग्रामीण विकास या विषयातील पदव्युत्तर पदवीधारक आहेत)
"स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे.मग ती कुणी असो!" असा आदेश देऊन परस्त्री मातेसमान मानण्याची संस्कृती या देशाला देणार्या महान,पुरोगामी,आधुनिक समतावादी दृष्टीकोन बाळगणार्या छत्रपती शिवरायांची आज जयंती!! जयंतीनिमित्ताने स्त्रियांच्या सन्मानाचा परीघ अखिल विश्वात विस्तारणार्या या बापमाणसाला मानाचा मुजरा! "बापमाणूस" हा शब्द यासाठी वापरला की,आपल्या राज्यातल्या प्रत्येक स्त्रीच्या अब्रुची काळजी एखाद्या पित्याप्रमाणे या राजाने वाहिली.
आजही जेव्हा कुठे महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना ऐकायला,पाहायला मिळतात,तेव्हा छत्रपती शिवरायांनी राझ्यांच्या पाटलाला दिलेली शिक्षा आठवली जाते.आणि ही कुठलीही दंतकथा नसून सत्यघटना आहे,हे सांगताना प्रत्येक भारतीय स्त्रीचा ऊर अभिमानाने नक्कीच फुलून येतो.सांगण्याचं तात्पर्य एकच की,द्रौपदीचं वस्त्रहरण होताना तिला वस्त्रे पुरवणार्या कृष्णापेक्षाही राझ्यांच्या पाटलाला शिक्षा करणारा हा राजा आम्हाला "सुपरहिरो" वाटतो.कारण न्यायावरती प्रचंड अशी निष्ठा आपल्याला महाराजांच्या ठायी पाहायला मिळते.
ज्या काळात भारतीय समाजातली स्त्री शूद्र म्हणून हिणवली जायची,त्या काळात स्त्रियांना सन्मानाने वागणूक देणं,हे प्रचंड मोठ्ठं पुरोगामित्वाचं उदाहरण अखंड महाराष्ट्रासमोर शिवराय घेऊन येतात,स्वराज्याच्या कुलमुखत्यारपदी ,न्याय-निवाडा करण्यासाठीही न्यायाधीश म्हणून जबाबदारी महिलांकडे सोपवणारे शिवराय आजच्या काळातसुद्धा स्त्री-पुरूष समानतेचं द्योतक ठरतात,कारण स्त्रीचा सन्मान करायचा असतो,मग ती कुणी असो,आपली,परकी,स्व-जातीतली किंवा परधर्मातली,याचं बाळकडू देणारी थोर आई जिजाऊंच्या रूपात शिवरायांना मिळाली होती,म्हणूनच तर राजा असुनही,प्रचंड मोठ्ठं ,बलाढ्य साम्राज्य उभं करूनही या राजाच्या दरबारात कधीच बाईचं नाचगाणं झालं नाही,कारण "बाई" ही केवळ उपभोगाची वस्तु नाही,हा आदर्श शिवरायांनी स्वतःच्या वागणुकीतून समाजापुढे ठेवला होता आणि पर्यायाने स्त्री-पुरूष समानतेची मुहूर्तमेढही शिवकाळातच रूजली गेलेली आपल्याला पाहायला मिळते.शत्रुच्या गोटातील स्त्रिया असोत किंवा नजराणा म्हणून मिळालेल्या स्त्रिया या सार्यांची सन्मानाने "चोळी-बांगडी" देऊन पाठवणी करणारा हा राजा प्रत्येक स्त्रीच्या मनात स्वतःची बंधूसमान एक आश्वासक प्रतिमा उभी करत होता,आणि त्यामुळेच तर हा राजा सामान्य रयतेला जवळचा आणि प्रिय वाटत होता.
आजही जेव्हा खैरलांजी,कोपर्डी,हैद्राबाद,हाथरस आणि मणिपुर सारख्या घटना पाहतो,ऐकतो,तेव्हा एकच प्रश्न मनात येतो, सांग ना शिवबा ! आम्ही जगावं की मरावं रे ? सांग ना ! खैरलांजी,कोपर्डी, हैद्राबाद,हाथरस,मणिपुर या सार्यांचा हिशोब अजून बाकी आहे,या सार्यांचा न्याय-निवाडा करणारा शिवदरबार कधी भरणार आहे???सांग ना शिवबा!!सांग ना!!
बेलवाडीच्या किल्लेदार असलेल्या स्त्रीवर आपल्या विजयी सेनापतीने बलात्कार केला आहे,हे समजताच शिवराय संतापतात आणि स्वतःच्या विजयी सेनापतीचे डोळे काढून जन्मभर तुरूंगात डांबून ठेवण्याची शिक्षा करतात,ती महिला शत्रु होती आणि सेनापती आपलाच होता म्हणून त्याची गय केली नाही.हा होता न्याय अन् स्त्रियांचा सन्मान करण्याची रीत!!आज संस्कृती आणि संस्कारानं रित्या झालेल्या या भारतीय समाजाला परत एकदा छत्रपती शिवरायांच्या काळाची आठवण करून देण्याची गरज भासतेय,कारण छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचा सन्मान करणारा परमोच्च आदर्श बिंदू होते.
What's Your Reaction?