मनाची निर्मळता आणि पावित्र्य जपणारे - संत रोहिदास महाराज
आय मिरर (लेखिका-स्वाती चव्हाण,लेखिका भारतीय संविधानाच्या अभ्यासक आहेत)
भारतीय संत परंपरेतील भक्ती चळवळीतील संत म्हणून संत रोहिदासांना ओळखले जाते.संत रोहादासांच्या जन्म तारखेबाबत इतिहासकारांमध्ये मतभिन्नता आढळते,त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील सीर गोवर्धनपूर गावात झाला.त्यांचे आई वडिल चामड्याचा व्यवसाय करायचे,त्यामुळे साहजिकच लहानपणापासूनच त्यांना जातीव्यवस्थेचे दाहक चटके सोसावे लागले होते,त्यांनी कायमच जातिव्यवस्थेला विरोध केला,ते आपल्या रचनेत म्हणतात,जाति-जाति में जाति हैं,जो केतन के पात!रैदास मनुष ना जुड़ सके,जब तक जाति ना जात !!
म्हणजेच माणसांनी निर्माण केलेल्या जातिवादामुळे माणूस माणसांपासून दुरावला जात आहे आणि जातीने माणसांत फूट पडली तर नुकसान मानवजातीचेच होणार आहे,असे संत रोहिदासांचे म्हणणे होते.संत रोहिदासांच्या काळात जातीवाद अतिशय शिगेला पोहचलेला होता.रोहिदासांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर गंगा नदीच्या किनारी तत्कालीन प्रस्थापितांनी अंत्यसंस्काराला विरोध केला होता,तसेच संत रोहिदासांवर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती.हे भीषण जातीवादाचेच परिणाम आपल्याला दिसून येतात.परंतु देह संपवता येतो,विचार संपवता येत नाहीत,या उक्तीप्रमाणे आजही संत रोहिदास गुरूग्रंथसाहिब या ग्रंथातून काव्यरूपाने आपल्या सर्वांच्या भेटीला येतात.
संत रोहिदासांनी भारतभर भ्रमण करून आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांतून काव्यरचना केली.ते म्हणतात,"जन्म के कारनै,होत न कोऊ नीच ! नर कूँ नीच करि डारि है,ओछे करम की कीच !! म्हणजेच,माणूस केवळ जन्माने नीच होत नाही तर केवळ त्याची कृती माणसाला खरी ओळख देते.
कुठलाही मनुष्य हा जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो,तर तो कर्मानेच श्रेष्ठ ठरतो,असे सांगत समस्त मानवजातीचे मूल्यमापन गुणवत्तेवर आणि कर्मावरच केले जावे हा संदेश पंधराव्या शतकात संत रोहिदास भारतीय समाजाला देतात.
"मन चंगा तो कटौती में गंगा!" म्हणजेच तुमचे मन शुद्ध असेल,तुमच्या मनात येणारे विचार शुद्ध असतील तर देव तुमच्या हृदयातच वास करतो.तुम्ही तुमच्या चांगल्या विचाराने आणि वर्तणुकीतून फलप्राप्ती करून घेऊ शकता,त्यासाठी मनातील वाईट विचार क्रोध,लोभ,मोह,मत्सर,माया यांचा त्याग करायला हवा.मन शुद्ध आणि निर्मळ असेल तर वेगळी देवपूजा करावी लागत नाही,हे तत्वज्ञान संत रोहिदासांनी भारतीय समाजाला दिले.पंधराव्या शतकात भक्तिचळवळीत अतिशय मोलाचे योगदान देणारे संत रोहिदास हे जातिअंताचा लढा देणारे थोर समाजसुधारक संत होते,असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
५ फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात संत रोहिदासांची जयंती साजरी केली जाते.त्यांच्या विचारांना प्रमाण मानून कर्मप्रधान आयुष्य प्रत्येकाने जगावं आणि कर्म हीच पूजा मानून कर्तव्याशी एकनिष्ठ राहावं,अशी अपेक्षा व्यक्त करत संत रोहिदास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करते !
What's Your Reaction?