राष्ट्रवादीच्या निकालावर फडणवीसांची 4 शब्दांत प्रतिक्रिया ! म्हणाले, 'हा निर्णय..'

Feb 7, 2024 - 10:42
 0  645
राष्ट्रवादीच्या निकालावर फडणवीसांची 4 शब्दांत प्रतिक्रिया ! म्हणाले, 'हा निर्णय..'

आय मिरर

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे. अजित पवार गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या राज्यामध्ये सत्तेत असलेल्या अजित पवार गटाचा सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टीचे राज्याची सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया अगदी 4 शब्दांमध्ये नोंदवल्या आहेत.

"हा निर्णय अपेक्षित आहे," या 4 मोजक्या शब्दांमध्ये फडणवीस यांनी या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली. "गेल्या अनेक वर्षात सातत्याने निवडणूक आयोगाने जी भूमिका घेतली त्याकडे पाहिल्यास अगदी समाजवादी पार्टीच्या केस वेळीही निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका आणि इतर 5 प्रकरणात घेतलेली भूमिका पाहा. आयोगाची सातत्याने अशीच भूमिका राहिलेली आहे. आलेला निर्णय अपेक्षितच आहे," असं फडणवीस म्हणाले. 

"बहुमताचा जो निर्णय घेतो तो लोकशाहीत महत्त्वाचा असतो," असंही फडणवीस म्हणाले. "पक्षाचे जे संविधानाचे किती पालन करण्यात आले हे खूप महत्त्वाचे असते. या सगळ्या गोष्टींचा उहापोह निर्णयात करण्यात आला आहे. मी अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन करतो," असंही फडणवीस यांनी सांगितलं. "अपेक्षा आहे की, अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात उत्तम काम करेल," अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी प्रतिक्रिया नोंदवली.

"बहुमताला महत्त्व आहेच पण नुसत्या बहुमताच्या आधारावर हा निर्णय झालेला नाही. सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे. पार्टीचं संविधान काय होतं, त्याचं किती पालन करण्यात आलं, निवडणुका झाल्या की नाही, पार्टी कोणाची आहे, अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह यामध्ये झालेला आहे," असं फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी ट्वीटरवरुनही यावर प्रतिक्रिया नोंदवली. "आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली. मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो," असं फडणवीस ट्वीटरवर म्हणाले.

"2019 मध्ये लोकशाहीचा मुडदा ज्यांनी पाडलेला त्यांना आज लोकशाही काय असते हे त्यांना समजले," असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow