"बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर."; निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मनसेचा दादांवर निशाणा
आय मिरर
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात अनपेक्षित निकाल देताना शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का देताना अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला आहे.
निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय देण्यास सांगितले आहे. त्यासाठी शरद पवार यांना 7 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेची वेळ देण्यात आली आहे. या निकालावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने X अकाउंटवरुन केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.
मनसेचा अधिकृत पेजवरून राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर रत्नागिरीतील सभेतून केलेला टीकेच्या व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर मनसेने अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
मनसेने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!’
What's Your Reaction?