त्यागातून प्रेमाचं नवं रूप दाखवणारी रमाई !
आय मिरर लेखिका -स्वाती लोंढे-चव्हाण
(लेखिका भारतीय संविधानाच्या अभ्यासक आहेत)
त्यागमूर्ती माता रमाईच्या १२६व्या जयंतीनिमित्त करूणेने ओथंबलेल्या हृदयातून कोटी कोटी प्रणाम!विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रवासात खंबीरपणे साथ देणार्या, अविरत कष्टाला वाहुन घेतलेल्या, समजूतदार,सोशिक,कष्टाळु, मायाळू,कनवाळु आणि मनाने तितक्याच कणखर असलेल्या रमाई त्यागमूर्ती म्हणून भारतीय इतिहासाच्या पानांत कायम स्मरणात राहतील.
रमाईचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ साली वणंद या गावी भिकू आणि रूक्मिणी धोत्रे यांच्या पोटी झाला. लहानपणीच मातापित्याचे छत्र हरवले आणि वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ४एप्रिल१९०६रोजी रमाई बाबासाहेबांसोबत विवाहबद्ध झाल्या,तेव्हापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत रमाईने बाबासाहेबांना खंबीरपणे साथ दिली.चवदार तळ्याचा सत्याग्रह असो की संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी उभारलेल्या प्रत्येक लढ्याचा आधार रमाईच होती.
"एखाद्या समाजाने किती प्रगती केली हे मोजायचे असेल तर त्या समाजातल्या स्त्रियांनी केलेल्या प्रगतीवरून समजते"असा मापदंड बाबासाहेबांनी स्त्रियांच्या प्रगतीबाबत सांगितला होता.महिलांच्या शिक्षणासोबतच बाबासाहेब महिलांच्या अर्थसाक्षरतेसाठीही आग्रही होते.रमाईंना प्रेमाने बाबासाहेब "रामू"अशी हाक मारत.रामूने शिकावं यासाठी बाबासाहेब खूप आग्रही होते.बाबासाहेबांनी लिहलेलं पुस्तक"थाॅट्स ऑन पाकिस्तान" हे त्यांनी माता रमाईला समर्पित करून भिमराव ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी साथ दिल्याबद्दल आभार मानले.प्रत्येक यशस्वी पुरूषांमागे एक स्त्री असते,या उक्तीप्रमाणे रमाई बाबासाहेबांची संघर्षगाथा ठरते.आज आपल्या देशात स्त्री-पुरूष समानता रूजावी म्हणून अनेक कार्यक्रम,उपक्रम आखले जातात.पण एका वेगळ्या आशयाची स्त्री-पुरूष समानतेची व्याख्या रमाई आपल्यासमोर घेऊन येते.स्त्री-पुरूष समानता म्हणजे फार काही जगावेगळं नसतं हो!स्त्री-पुरूष समानता म्हणजे एकमेकांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करून ते स्वीकारणे,म्हणजे स्त्री-पुरूष समानता असं मी तरी मानते.रमाई आणि बाबासाहेबांनी तो स्त्री-पुरूष समानतेचा धडा समस्त विश्वाला त्यांच्या जीवनचरित्रातूनच दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच राबवलेला एक उपक्रम पती-पत्नीच्या संयुक्त नावे मिळकत नोंदी करणे,मला वाटतं याचं ज्वलंत उदाहरणच बाबासाहेबांनी रमाईच्या नावे घर करून समाजापुढे ठेवले होते.
फेब्रुवारी महिना हा अनेक दिवस साजरा करायला लावणारा महिना आहे,रोज डे,चाॅकलेट डे,हग डे,वॅलेंटाईन्स डे वगैरे वगैरे ..पण याच महिन्यात आपल्या अतुल्य अशा त्यागातून बाबासाहेबांवरचं अतूट प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःच्या कृतीतून दाखवणार्या रमाई मातेचे स्मरण आजच्या तरूणाईला होईल का?
शेजारणीने एखादी नवी साडी घेतली म्हणून मलाही तशीच साडी हवी,असा हट्ट करणार्या महिला आपण आपल्या आजूबाजूला पाहतो,पण फाटक्या लुगड्यातसुद्धा आनंदी राहता येतं,फक्त स्वतःची ओजंळ समाधानाने भरलेली असावी,हे वैश्विक तत्वज्ञान सांगणारी रमाई आजच्या महिलावर्गाला भावेल का??
"साहेब!माझा आजार बरा करण्यासाठी अनेक डाॅक्टर भेटतील,पण या समाजाचा आजार बरा करण्यासाठी तुम्ही एकटेच डाॅक्टर आहात!"हा विश्वास बाबासाहेबांमध्ये निर्माण करणारी रमाई खर्या अर्थाने संघर्षाची सूत्रधार ठरते.
बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रवासात स्वतः कष्ट करून बाबासाहेबांना शिक्षणाला पैसा देणारी रमाई पाहिली की,वाटतं "खरं प्रेम तर रमाईनंच बाबासाहेबांवर केलं"
त्यांच्या प्रत्येक कार्यात साथ दिली.स्वतःच्या पोटची मुलं गमावूनसुद्धा कधीच तक्रार केली नाही.दुःख,यातना,वेदना सोसूनसुद्धा बाबासाहेबांच्या कार्यात लढाऊवृत्तीने साथ देणारी रमाई अजरामर ठरते म्हणूनच रमाईचे ॠण कधीच न फिटणारे आहेत!!म्हणूनच मी म्हणेन....
रमाई!
तुझ्या ॠणात आजन्म आम्ही
तुझ्याचमुळे भीमविचारांची सावली
तुझ्या त्यागापुढे नतमस्तक आम्ही
तुझ्या ॠणात आजन्म आम्ही!!
रमाई!
भिमाच्या संसारी तुझं नांदणं,
त्यामुळेच आज आमच्या नभी-अंगणी चांदणं,
तुझ्या कष्टाचे कसे होऊ उतराई?आई,
तुझ्या ॠणात आजन्म आम्ही!!
रमाई!
इंदू,गंगाधर,राजरत्न
गमावूनसुद्धा तक्रार नाही ओठीं,
भाग्यच लागतं गं आई,
जन्म घ्यायला तुझ्या पोटी,
तुझ्या ॠणात आजन्म आम्ही!!
रमाई!!
पोटच्या लेकरांची आहुती देऊन,
तू उभं केलंस या लेकरांना,
भीमसूर्याच्या प्रकाशकिरणांत
न्हाऊ घातलंस आम्हाला
तुझ्या ॠणात आजन्म आम्ही!
रमाई!
त्याग,समर्पण,आणि ममत्व
या भूतलावरचं श्रेष्ठ तुझं मातृत्व
स्वतः फाटक्या लुगड्यात राहून
आम्हाला भरजरी दान दिलंस तू
तुझ्या ॠणात आजन्म आम्ही!!
रमाई!
तुझ्या कपाळावरच्या कुंकवात
आभाळाएवढा बाप दिसतो आम्हाला
चवदार तळं म्हणू की संविधान
तुझ्याच आधारानं मिळालं आत्मभान
तुझ्या ॠणात आजन्म आम्ही!!
What's Your Reaction?