आ.भरणेंची आज इंदापूरच्या लुमेवाडीत जाहिर सभा ; भरणे घेणार जातीयवादाच्या टीकेवरुन विरोधकांचा समाचार? 

Feb 11, 2024 - 08:18
Feb 11, 2024 - 10:16
 0  419
आ.भरणेंची आज इंदापूरच्या लुमेवाडीत जाहिर सभा ; भरणे घेणार जातीयवादाच्या टीकेवरुन विरोधकांचा समाचार? 

आय मिरर (देवा राखुंडे) 

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल जवळ येताच इंदापुरात राजकारण तापू लागले आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाताहेत. मागील चार दिवसापूर्वी इंदापूर तालुक्यातील डाळज येथील एका हॉटेलच्या कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या मुस्लिम नेत्यांनी आमदार दत्तात्रय भरणेंवर जातीयवादाचा ठपका ठेवला.याच सोबत भरणे हे अल्पसंख्यांक विरोधी असून मुस्लिमांच्या अन्नात माती कालवताहेत असे गंभीर आरोपही केले. आता याच आरोपांवरुन आमदार दत्तात्रय भरणे हे हर्षवर्धन पाटील यांवर अप्रत्यक्ष टीका करीत विरोधकांचा चांगलाचं खरपूस समाचार घेण्याची शक्यता आहे.

आज रविवारी दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी इंदापूरच्या लुमेवाडीत ८ कोटी २० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आ. भरणे यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.याच ठिकाणी आ.भरणे यांची जाहीर सभा देखील पार पडणार आहे. याच सभेत आमदार दत्तात्रय भरणे विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देतील का ? याकडे आत्तापासूनच सर्वांची नजर लागली आहे.

या कार्यक्रमास माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील,श्रीमंत ढोले,माजी सभापती प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,अतुल झगडे,दत्तात्रय घोगरे ,श्रीकांत बोडके,सचिन सपकळ, नवनाथ रूपनवर,शुभम निंबाळकर,सचिन खामगळ यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

मागील चार दिवसापूर्वी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यात असणाऱ्या हॉटेल उदय वरती अन्न व औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईवरून आमदार भरणे यांना मुस्लिम समाजाचे भाजपाचे कार्यकर्ते बबलु पठाण यांनी टार्गेट केलं.भरणेंवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. या आरोपांच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष इकबाल शेख यांनी शनिवारी दि.१० रोजी खंडन केलं. तुमच्या नाकर्तेपणाचं खापर आमच्या नेत्यावरती फोडू नका.तुमच्यावर करण्यात आलेली कारवाई ही अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. त्यांचे निर्बंध तुम्ही पाळलेले नाहीत;शिवाय तुमच्या हॉटेल बद्दल सुज्ञ जनतेने अनेक तक्रारीही केल्या आहेत. आ.भरणे यांनी तुमच्या हॉटेलवर कारवाई करा असं कुठेही म्हटलेलं नाही.उलट भरणे यांनी भिगवन या ठिकाणी असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस स्थानकावरील कॅन्टीन चालू करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. मात्र तुम्ही आकसापोटी कारवाईचे निमित्त करून आरोप करत आहात. त्यामुळे ही कारवाई तुमच्या वैयक्तिक व्यवसायातील आहे त्याचा राजकारणाशी संबंध जोडण्याचे कारण नाही. 2024 ला मुस्लिम समाज कोणाच्या पाठीमागे आहे हे दाखवून देऊ घोडे मैदान दूर नाही म्हणत त्यांनी भारतीय जनता पार्टीला निर्वाणीचा इशाराच दिला आहे.

आता याच मुद्द्यावरून लुुमेवाडीत होणाऱ्या जाहीर सभेत आमदार दत्तात्रय भरले विरोधकांवरती तुटून पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात जरी महाविकास आघाडी असली राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सरकारमध्ये सहभागी जरी असला तरी स्थानिक पातळीवर मात्र भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते हे एकमेकांवरती तुटून पडताना पाहायला मिळताहेत. राज्यात अनेक ठिकाणी हे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत देखील या दोन्ही पक्षात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळू शकतो. सध्य परिस्थिती पाहता येणाऱ्या 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे यांच्यात टोकाचा संघर्ष पहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही.

भाजपाचे गांव चलो अभियान…

दुसरीकडे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बोरी गावाला लक्ष केलय. शनिवारपासून हर्षवर्धन पाटील बोरी गावात तळ ठोकून आहेत. एकट्या बोरी गावामुळे 2019 ला आपला पराभव झाल्याची सल हर्षवर्धन पाटील यांनी पाठीमागेच जाहिरपणे बोलून दाखवली होती. ज्या गावाने आपल्याला नाकारलं त्याच गावात हर्षवर्धन पाटील यांनी शड्डू ठोकला.त्यामुळे 2019 मध्ये आ.भरणे यांना झुकतं माप देणाऱ्या बोरीतूनचं बेरजेच्या राजकारणाला हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवात केल्याची अशी चर्चा आहे.भविष्यात आपलं मताधिक्य कायम राखण्यासाठी आ.भरणे बोरीत कोणती जादू चालवतात हे देखील पहावं लागणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow