ब्रेकिंग | मुंबईनंतर पिंपरी चिंचवडमध्ये मोठं होर्डिंग कोसळलं !
आय मिरर
मंगळवारी मुंबईतील घाटकोपर येथे मोठं होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असताना आता पिंपरी-चिंचवड शहरातही अशीच घटना घडली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले. सुदैवाने यात कुणीही जखमी किंवा जीविहितहानी झालेली नाही.
दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला. यामध्ये वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्या लागत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नाही. यापूर्वी पुण्यात होर्डिंग कोसळून 5 जणांचा बळी गेला होता. यानंतरही प्रशासनाला जाग आल्याचे दिसत नाही.
पिंपरी चिंचवडमध्ये कोसळलेलं होर्डिंग अधिकृत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ते एका बाजूला झुकले होते ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित होर्डिंग मालकाला ते होर्डिंग काढून घेण्यासंदर्भात सूचना केल्याचा महापालिका प्रशासनाने दावा केला आहे.कोसळलेलं होर्डिंग दुर्घटनेची महापालिका प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित मालकाविरुद्ध आणि स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सहायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली.
What's Your Reaction?