लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार ! 'वर्षा' निवासस्थानातून मोठी बातमी

Nov 25, 2024 - 08:52
Nov 25, 2024 - 08:52
 0  179
लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार ! 'वर्षा' निवासस्थानातून मोठी बातमी

आय मिरर

राज्यामध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचं श्रेय लाडक्या बहिणींना दिलं जात आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांच्या औक्षण केलं.

यावेळी निलम गोऱ्हे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. शिंदे यांनी यावेळी बोलताना लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे.

लाडक्या बहिणींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यामध्ये लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आहे. आपण जे विकासाचं आणि कल्याणकारी योजनांचं काम केलं, त्याचं महायुतीला फळ मिळालं आहे. सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.

''विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेता बनवण्याएवढंही संख्याबळ राहिलेलं नाही, एवढा मोठा हा विजय आहे. लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. त्यामुळे लाडक्या बहिणींची एक लाट निर्माण झाली. त्या लाटेमध्ये विरोधक वाहून गेले आहेत. हा सगळा चमत्कार बहिणींनी केला आहे.'' असं शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी आज तुम्हाला एवढंच सांगतो, हा लाडका भाऊ तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की, लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला काहीतरी मदत झाली पाहिजे. त्यापुढे आम्ही तीन गॅस सिलिंडरची योजना आणली. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत दिली. लेक लाडकी योजना राबवली. या योजना विचारपूर्वक राबवलेल्या आहेत.

''हे सरकार सर्वसामान्यांचं, गोरगरीबांचं सरकार आहे. काँग्रेस बोलून गेली गरीबी हटाओ, पण गरीबी गेली नाही. मोदीजींनी २५ कोटी लोकांची गरीबी हटवली आहे. आता आम्ही ठरल्याप्रमाणे दीड हजार रुपयांचे २१०० रुपये करणार आहोत. त्याचाही निर्णय लवकरच होणार आहे.'' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन लवकरच पाळणार असल्याचं म्हटलं आहे.

शिंदे शेवटी म्हणाले, तुम्ही मतदान करताना घेतलेला निर्णय यशस्वी ठरला आहे. खूप मोठा विजय महायुतीला मिळाला आहे. राज्यातली लोक खूप खुश आहेत. लाडक्या बहिणींनी हे सरकार पुन्हा आणलं आहे. त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद कायम असू द्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow