इंदापुरात मराठा बांधव आक्रमक ! राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे, नगरपरिषद प्रांगणात जोरदार घोषणाबाजी
आय मिरर(देवा राखुंडे)
भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. राणे यांनी ट्वीट करत, मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असे म्हणत नारायण राणेंनी खालच्या पातळीची टीका केली.
यानंतर शुक्रवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्याच्या इंदापूर शहरात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.इंदापूर नगर परिषदेच्या प्रांगणात नारायण राणे पिता-पुत्रांच्या पोस्टरला जोडे मारत राणे यांच्या वक्तव्याचा मराठा समाज बांधवांनी निषेध नोंदवला आहे. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव महिला भगिनी देखील सहभागी झाल्या होत्या.
अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांसंदर्भातील कायद्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, मनोज जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केला होता. महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावरूनच नारायण राणे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले होते.
What's Your Reaction?