शिंदेंच्या पाहणी दौऱ्यात आमदाराचा तोल गेला, गटारात पडले अन् हात मोडला...

आय मिरर
अंबरनाथमध्ये शनिवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विकासकामांचा पाहणी दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यात त्यांच्या समवेत सहभागी झालेले कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे गटार ओलांडताना पडल्याने हाताला दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे अंबरनाथ शहरात होते. अंबरनाथ शहरात क्रीडा संकुल, नाट्यगृह, शाळा आणि शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली.
त्यावेळी अंबरनाथ पश्चिमेतील क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर आमदार राजेश मोरे सर्वसमावेत निघत होते. त्यावेळी एक गटार ओलांडताना राजेश मोरे यांचा तोल गेला. तोल गेल्याने मोरे हे लहानशा गटारात पडले. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली असल्याची माहिती आहे. त्यांना सुरुवातीला डोंबिवली आणि नंतर मुंबईच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नेमकं काय घडलं ?
अंबरनाथ पश्चिमेच्या नेताजी मार्केट परिसरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी सुरू असताना हा प्रकार घडला. खासदार श्रीकांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये पाहणी करत असताना आमदार राजेश मोरे हे मैदानाच्या बाहेरील बाजूस उभे होते. तिथून गटार पार करून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांचा तोल जाऊन ते कोसळले. यावेळी त्यांचा हात दुखू लागल्याने त्यांनी डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात धाव घेतली. तिथे एक्स-रे काढल्यानंतर त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
What's Your Reaction?






