'ओबीसी' कोट्यातून नको, आरक्षणाची मर्यादा वाढवा - शरद पवार
आय मिरर
ओबीसींच्या अथवा कोणत्याही कोट्यातून मराठा समाजाला नको, त्यातून वाद वाढतील. त्यापेक्षा केंद्र सरकारने अधिवेशन घेऊन आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक १५-१६ टक्क्यांनी वाढविण्याची तरतूद करावी.
त्यातून इतरांवर अन्याय न होता मराठा आरक्षाचाही प्रश्न सुटेल,'' अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जळगावातील पत्रकार परिषदेत मंगळवारी मांडली.
राज्यात सर्वत्र भीषण दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेरची वाट न पाहता दुष्काळाच्या सर्व निकषांच्या आधारावर राज्यात उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, की ओबीसीच्या कोट्यातून अथवा अन्य प्रकारे आरक्षण देणे योग्य होणार नाही. या विषयात अनेक कायदेशीर बाबी, अडचणी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ती ६५-६६ टक्क्यांपर्यंत वाढवून द्यावी, त्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनात तरतूद करण्याची मागणीही त्यांनी केली.
मराठा समाजाच्या आंदोलकांवरील लाठीमाराबाबत फडणवीसांनी माफी मागितल्याच्या मुद्यावर पवार म्हणाले, अशाप्रकारे सरकार माफी मागत असेल तर त्यातून यामागचा बराच भाग स्पष्ट होतो. वरिष्ठ नेत्याने आंदोलनाचा भडका उडवण्यासाठी चिथावणी दिल्याच्या प्रश्नावर ''या विषयी सरकारने खोलात जाऊन चौकशी करावी, ते त्यांचे काम आहे,'' असे ते म्हणाले.
What's Your Reaction?