महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणूक; नेमके टप्पे कोणते?

Mar 16, 2024 - 17:04
 0  866
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणूक; नेमके टप्पे कोणते?

आय मिरर

देशात लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुका १९ एप्रिलला होणार आहेत. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा १९ एप्रिलला, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी, सहावा टप्पा २५ मे रोजी आणि शेवटचा सातवा टप्पा १ जून रोजी होणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातही पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. २०२४ ची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक विशेष असणार आहे. दोन गटात विभागलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोणता पक्ष किती जागा जिंकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे रोजी मतदान होणार आहे.

मतदानाचे टप्पे जाणून घ्या

टप्पा १:- १९ एप्रिल २०२४ (१०२ जागा)

टप्पा २:- २६ एप्रिल २०२४ (८९ जागा)

टप्पा ३:- ०७ मे २०२४ (९४ जागा)

टप्पा ४:- १३ मे २०२४ (९६ जागा)

टप्पा ५:- २० मे २०२४ (४९जागा)

टप्पा ६:- २५ मे २०२४ (५७ जागा)

टप्पा ७:- १ जून २०२४ (५७ जागा)

मतमोजणी :- ४ जून २०२४

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत, ८० जागांसह उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकत्र निवडणूक लढली होती. तेव्हा एनडीएकडे ४१ जागा होत्या. भाजपाने २३ जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला. याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४, काँग्रेस एक आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने एका जागेवर विजय मिळवला होता.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक २०१९ वर एक नजर

महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुका चार टप्प्यात पार पडल्या होत्या. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी ७ जागांसाठी मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान झाले. या कालावधीत १० जागांवर मतदान झाले. २३ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात १४ जागांवर मतदान झाले. चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी १७ जागांवर मतदान झाले होते.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०१९ टप्पे

पहिला टप्पा : एप्रिल ११ (७ जागा)

दुसरा टप्पा : एप्रिल १८ (१० जागा)

तिसरा टप्पा : एप्रिल २३ (१४ जागा)

चौथा टप्पा: एप्रिल २९ (१७ जागा)

कोणत्या पक्षांनी निवडणूक लढवली?

महाराष्ट्रातील प्रमुख दावेदार संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) होते. UPA मध्ये काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) यांचा समावेश होता, तर NDA मध्ये भाजपा आणि शिवसेना यांचा समावेश होता.

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०१९ चे निकाल

२३ मे २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपाने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या. शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. काँग्रेसला १ जागा मिळाली. एआयएमआयएमने १ जागा जिंकली आणि अपक्ष उमेदवारानेही एक जागा जिंकली. अमरावतीमधून विजयी झालेल्या या अपक्ष उमेदवार नवनीत राणा होत्या. परंतु यावेळी मात्र चित्र बदलले आहे. एकीकडे शिवसेनेत दोन गट पडले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचीही पूर्वीसारखी स्थिती नाही. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा एक गट भाजपाबरोबर आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारचा एक भाग आहे, तर शरद पवार यांच्या पक्षाला आता नवे चिन्ह मिळाले आहे. अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपा आणि शिंदे सेनेत दाखल झाले असले तरी विरोधी पक्षात काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, जो पूर्वीसारखा एकजूट असल्याचंही राजकीय जाणकारांचं मत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow