कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा झटका, सुनावली दोन वर्षाची शिक्षा

आय मिरर
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने कोकाटे यांना सुनावली आहे.
काय आहे प्रकरण ?
माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल होता. १९९५ च्या प्रकरणात कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.
१९९५ साली कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. भारतीय दंड विधान ४२०, ४६५, ४७१ आणि ४७ अन्वये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. ३० वर्षांनी या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतिम निकाल दिला असून माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह दोघांनाही न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
कशी केली फसवणूक ?
माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आमचे उत्पन्न हे कमी आहे, आम्हाला दुसरे घर नाही अशा स्वरूपाची माहिती शासनाला दिली होती. त्यानंतर शासनाकडून माणिकराव कोकाटे यांना सदनिका मिळाल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण चार जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र कोर्टाने उर्वरित दोघांना कोणतीही शिक्षा सुनावलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
What's Your Reaction?






