GBS : दौंड मधील 37 वर्षाच्या पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू ! एकाच दिवशी दोन बळी

Feb 20, 2025 - 17:04
Feb 20, 2025 - 17:05
 0  274
GBS : दौंड मधील 37 वर्षाच्या पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू ! एकाच दिवशी दोन बळी

आय मिरर

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील 37 वर्षीय पुरुषाचा 17 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये त्याचं निधन झाले आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी गुइलेन-बॅरे सिंड्रोम ची लक्षणे आढळून आल्याने या पुरुषाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन थेरपी आणि व्हेंटिलेटरी सपोर्ट मिळाल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली, ज्यामुळे तीव्र श्वसनक्रिया बंद पडली आणि 17 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.

तर मागील दोन दिवसांपूर्वी गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) मुळे बारामती येथील 21 वर्षे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.किरण राजेंद्र देशमुख असं बारामती मधील मृत्यू झालेल्या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे.तिचं मंगळवारी निधन झालंय. किरण तीन आठवड्यांहून अधिक काळ जीबीएस शी झुंज देत होती. 

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे मतदारसंघ आणि गृहनगर असलेल्या बारामती येथील रहिवासी किरणला हा आजार झाला तेव्हा ती तिच्या शिक्षणासाठी सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. या भागात जीबीएसचे अनेक रुग्ण आढळले आहेत आणि दुर्दैवाने किरणलाही संसर्ग झाला होता. सुरुवातीला तिला अतिसार आणि अशक्तपणा यासारखी लक्षणे जाणवली, ज्यामुळे तिच्या कुटुंबियांना तिला बारामतीला घेऊन जावे लागले, जिथे तिची तज्ञांनी तपासणी केली.

बारामतीमध्ये उपचार घेतल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तिच्या लक्षणांवरून डॉक्टरांना जीबीएसचा संशय आला आणि पुढील उपचारांसाठी तिच्या कुटुंबियांना तिला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. किरणला २७ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते, परंतु तिची प्रकृती खालावली आणि मंगळवारी उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले.

जीबीएसचा धोका वाढतोय का ?

पुण्यात जीबीएसचा धोका वाढला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्यात एकाच दिवशी दोन जणांचा जीबीएसने मृत्यू झाला आहे.तर एकूण मृत्यूंची संख्या 11 वर पोहोचली आहे.दौंडमधील 37 वर्षीय पुरूष आणि नांदेड सिटीमधील २६ वर्षीय तरुणीचा एकाच दिवशी 17 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. 

दौंड मधील रुग्णाचा ससूनमध्ये तर नांदेडसिटीमधील तरुणीचा काशीबाई नवले रुग्णालयात मृत्यू झाला आहे.या दोघांनाही अशक्तपणा आला होता. दोघेही व्हेंटिलेटरवर होते.जीबीएस आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आणि आटोक्यात येत असल्याचं महापालिका सांगत आहे मात्र मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow