पंढरपुरात चंद्रभागेची पाणी पातळी धोकादायक स्थितीत

Aug 27, 2024 - 16:24
 0  264
पंढरपुरात चंद्रभागेची पाणी पातळी धोकादायक स्थितीत

आय मिरर

पंढरपूर तालुक्यात पाऊस कमी असला, तरी वीर व उजनी धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा (भीमा) नदीला पूर आला आहे. चंद्रभागा नदीतील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे.दरम्यान, नदीकाठच्या गावांनी पुराची धास्ती घेतली आहे.

उजनी व वीर धरणांच्या खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वीर-उजनी धरणे 100 टक्के भरलेली आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणांतून नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणातून 81 हजार 600 क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे. वीर धरणातून नीरा नदीत 47 हजार 121 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे संगम येथून नीरा नदीचे पाणी भीमा नदीत मिसळत आहे. यामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या संगम येथे एक लाख 29 हजार क्युसेकने पाणी वाहत आहे. पंढरपूर येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता 80 हजार क्युसेकने पाणी वाहत आहे. मध्यरात्री पंढरपूर येथे सव्वा लाखाचा विसर्ग येण्याची भीती आहे.

या पाण्याने चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना वेढा दिला आहे. तर, जुना दगडी पूल व भीमा नदीवरील तालुक्यातील इतर आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. एक लाख 30 हजार क्युसेक पाणी आले, तर पंढरपूर शहरातील नदीकाठची व्यास नारायण व अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील घरांत पुराचे पाणी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पूल, बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद

पंढरपूर तालुक्यात भीमा नदी 80 हजार क्युसेकने वाहत आहे. 40 हजार क्युसेकला कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जातात. त्यामुळे पंढरपूर येथील जुना दगडी पूल, गोपाळपूर, पटवर्धन कुरोली, पीराची कुरोली, गुरसाळे, कौठाळी, मुंढेवाडी, पुळूज येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली असून, येथे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow