उरुळी कांचन जवळील वळतीत डीझेलने भरलेला टँकर पलटी
आय मिरर
उरळी कांचन जवळील वळती ग्रामपंचायत हद्दीत कात्रजकडे डीझेल घेऊन निघालेल्या टँकरचा अपघात झाला आहे. यावेळी स्थानिकांनी अपघात पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकरचे मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले आहेत. टँकर डीझेलने भरलेला असून सुदैवाने अपघातात टाकी लिकेज न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा टँकर हा तरडे येथील भारत पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून डीझेल भरून कात्रज या ठिकाणी खाली करण्यासाठी निघाला होता. टँकर चालकाचे नियंत्रण सुटून हा टँकर थेट रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. यावेळी शिंदवणे ते वळती रस्त्यावर एका चारचाकी गाडीने टँकरला काट मारल्याचा आरोप चालकाने केला आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अपघात झालेल्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर अग्निशमन विभागाच्या पथकाला महिती देण्यात आली आहे. तसेच उपस्थित नागरिकांना बाजूला करत मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांनी कार्य सुरु केले आहे.
रस्त्यावरून रिकामे व भरलेले टँकर सुसाट…
यावेळी बोलताना वळती येथील एक नागरिक नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, ” तरडे येथील भारत पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून निघणारे टँकरचे चालक हे दारू पिऊन टँकर चालवतात. यावेळी या रस्त्यावर जणू काही टँकर पळवण्याची स्पर्धाच सुरुच आहे. आताचा अपघात हि गाडी सुसाट असल्यानेच झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
What's Your Reaction?