सासवड तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र चोरणारे दोन चोरटे गजाआड

Feb 8, 2024 - 12:43
Feb 8, 2024 - 12:44
 0  285
सासवड तहसीलदार कार्यालयातून मतदान यंत्र चोरणारे दोन चोरटे गजाआड

आय मिरर

सासवडमधील तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून मतदान यंत्रे (कंट्रोल युनिट) चोरून पसार झालेल्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेले चोरटे सराइत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे.

भैय्या उर्फ शिवाजी रामदास बंडगर (वय २१), अजिंक्य राजू साळुंखे (वय २१, दोघे रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात मतदान यंत्रे (ईव्हीएम, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट) ठेवण्यात आली आहेत. चोरट्यांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. 

खोलीतील लोखंडी मांडणीवर मतदान यंत्रे ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी एक मतदान यंत्र (डेमो) चोरून नेल्याचे मंगळवारी उघडकीस आले. तहसील कार्यालयातून मतदान यंत्र चोरीला गेल्यानंतर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सासवड पोलिसांचे पथकाने चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. समांतर तांत्रिक तपास सुरू करण्यात आला होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार बंडगर आणि साळुंखे यांना अटक करण्यात आली. दोघे जण सराइत असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असे पाेलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

मतदान यंत्र चोरीला गेल्यानंतर निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली. मंगळवारी रात्री पुरंदर-दौंड प्रांतधिकारी वर्षा लांडगे-खत्री, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहायक फौजदार डी. एल. माने, गृहरक्षक दलाचे जवान राहुल जरांडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow