बिग ब्रेकींग | पिंगोरीत भीषण वनवा ; दीड हजार एकर वनसंपदा राख

Apr 18, 2026 - 08:53
 0  3
बिग ब्रेकींग | पिंगोरीत भीषण वनवा ; दीड हजार एकर वनसंपदा राख

आय मिरर 

पुरंदर तालुक्यातील पिंगोरी परिसरात डोंगराला भीषण वनवा लागून सुमारे दीड हजार एकरांवरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. या आगीत शेतकऱ्याचा जनावरांसाठी साठवून ठेवलेला कडबा देखील जळून नष्ट झाला असून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

पिंगोरी येथील डोंगररांगांमध्ये लागलेल्या या वनव्याने काही तासांतच विक्राळ रूप धारण केले. पिंगोरीचे पोलिस पाटील व सरपंच यांच्या विनंती नंतर वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. हा संपूर्ण भाग जेजुरीच्या खंडोबा मंदिरालगतचा असून, दरवर्षी भाविकांच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारचे वनवे लागतात, अशी माहिती पोलिस पाटील राहुल शिंदे यांनी दिली.

वनविभागाच्या माहितीनुसार, काल सायंकाळी पाचा वाजलेच्या सुमारस सुरुवातीला साकुर्डे हद्दीत खाजगी डोंगररानाला आग लागली होती. ही आग शासकीय वनक्षेत्रात पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने नियंत्रण मिळवण्यात आली . मात्र त्यानंतर कवडेवाडी परिसरात, खंडोबा मंदिरालगतच्या डोंगर भागातही आग लागल्याचे निदर्शनास आले. वनविभागाने दुपारी चार वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

दरम्यान, कवडेवाडी येथील शेतकरी भरत यादव व मारुती यादव यांच्या शेतातील सुमारे दोन हजार कडब्याची गंज जळून खाक झाली. उन्हाळ्यासाठी साठवलेला हा जनावरांचा चारा नष्ट झाल्याने सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पिंगोरीचे तलाठी बोबडे यांनी घटनास्थळी पंचनामा करून शासकीय मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

उन्हाळा सुरू होताच अशा वनव्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी पिंगोरी येथील तुकाईनगर येथेही वनवा लागला होता. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो वेळीच विझवण्यात आला होता.

“पिंगोरी परिसरात वनवा लागू नये यासाठी जनजागृती केली जाते. मात्र प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे आगीच्या घटना घडतात. ग्रामपंचायतीकडे आग विझवण्याची साधने नसल्याने शासनाने ग्रामीण भागात यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.”— संदीप यादव, सरपंच, पिंगोरी

 “दरवर्षी भाविक किंवा प्रवाशांकडून निष्काळजीपणे टाकलेल्या काड्यांमुळे वनवे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होत आहे.”त्याचा बरोबर शासकीय आणि स्थानिक यंत्रणावर त्याचा मोठा तणाव वाढला आहे.— राहुल शिंदे, पोलिस पाटील, पिंगोरी

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow