आज माझा भाऊच नाही राहिला, त्यामुळे आता काय जुने उगाच कुणाबद्दल काय काढावे...
आय मिरर
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत माझी अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती. आमच्यात जे बोलणे झाले होते ते दादांना माहिती होते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
खासदार सुळे म्हणाल्या, 'आपल्याकडे लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, पण अनेकवेळा लोकांना मी हे बोललेले आवडत नाही. आज माझा भाऊच नाही राहिला, त्यामुळे आता काय जुने उगाच कुणाबद्दल काय काढावे. भावाचे आणि माझे जे काय बोलणे होते ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे, आणि ते वास्तव आहे.
बऱ्याच लोकांना या गोष्टीची माहिती आहे. आज दादा नाही त्यामुळे मला काही जुनं उणं धुणं काढत बसायचं नाही. तो माझा मोठा भाऊ होता, आज माझा भाऊ जिथे असेल तिथे त्याला ते माहिती आहे. त्यामुळे दादाची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे पुढे बघूया,''
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. गृहमंत्री अमित शहा यांनीही तब्येतीची विचारपूस केली. पवार यांना शुक्रवारी रुग्णालयातून सोडले जाऊ शकते, अशी माहिती सुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल विचारले असता सुनेत्रा वहिनीसोबत मी यापूर्वी काम केले आहे.
सुनेत्रा वहिनीकडे नवीन जबाबदारी आली आहे. एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे.अजितदादा नसण्याचे दुःख कधीच भरून निघणार नाही. आजही खरं वाटत नाही की, दादा नाहीत. सध्या आमचे कुटुंब अडचणीतून जात आहे, असे सुळे यांनी सांगितले.
What's Your Reaction?