बिग ब्रेकिंग | भरधाव ट्रॅव्हलरने रिक्षा चिरडली, 5 जणांचा करुण अंत

Jan 7, 2026 - 11:38
Jan 7, 2026 - 11:45
 0  1676
बिग ब्रेकिंग | भरधाव ट्रॅव्हलरने रिक्षा चिरडली, 5 जणांचा करुण अंत

आय मिरर 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर आज मृत्यूने भीषण तांडव घातले. उंबरे गावाच्या हद्दीत असलेल्या तांबे पेट्रोलपंपाजवळ भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर आणि रिक्षाचा अत्यंत भीषण अपघात झाला.

या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत रिक्षातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, अनेक जण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाले आहेत.

धडक इतकी भीषण की...

मिळालेल्या माहितीनुसार, एक टेम्पो ट्रॅव्हलर शनीशिंगणापूरच्या दिशेने प्रचंड वेगात जात होता. याच वेळी राहुरीकडून एक प्रवासी रिक्षा समोरून येत होती. तांबे पेट्रोलपंपाजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षा चेंडू सारखी हवेत उडाली आणि तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेनंतर अनियंत्रित झालेला टेम्पो ट्रॅव्हलरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

घटनास्थळी रक्ताचा सडा आणि आक्रोश

अपघाताचा आवाज होताच उंबरे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे पडलेले रक्ताचे सडे आणि प्रवाशांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. रिक्षामध्ये बसलेल्या पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. टेम्पो ट्रॅव्हलरमधील अनेक पर्यटकही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी जीवाची पर्वा न करता जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने राहुरी व अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले.

वाहतूक ठप्प, परिसरात हळहळ

या भीषण अपघातामुळे शनीशिंगणापूर रोडवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने पंचनामा केला आणि क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. मृतांची अधिकृत ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

शनीशिंगणापूर मार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. "रस्त्यांवरील वाढती वेगमर्यादा आणि नियमांचे उल्लंघन निष्पाप जीवांच्या जीवावर उठत आहे," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow