पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर कोसळली दरड
राहुल शिंदे, पुरंदर
छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी दरड कोसळली असून रस्त्यावर चिखल आणि राडारोडा पसरलाय.
पुरंदर किल्ला हा सध्या सैनिकांच्या ताब्यात आहे.या किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता देखील बनवण्यात आलेला आहे.या किल्ल्यावर दररोज शेकडो शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात मात्र मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील जमिनीची पकड सैल झाली असून रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
शनिवारी रात्री या रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्यावर एका ठिकाणी दरड कोसळली असून यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना झाली नाही. रात्रीच्या वेळेस ही दरड कोसळलेली त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला.
सकाळी गडावर जाणाऱ्या काही स्थानिक लोकांच्या निदर्शनास ही गोष्ट आली त्यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे. तर याबाबतचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.प्रशासनाकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
What's Your Reaction?