जेजुरीत लोणारी समाजाचा एल्गार ; २३ एकर जागा व धर्मशाळा वाचवण्यासाठी भव्य मोर्चा
आय मिरर
जेजुरीत लोणारी समाजाच्या २३ एकर जागेच्या आणि धर्मशाळेच्या संरक्षणासाठी आज लोणारी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ट्रस्टच्या कथित मनमानी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, मागील पिढीतील दानशूर व्यक्तींनी समाजासाठी दिलेल्या जमिनी आणि धर्मशाळा ही लोणारी समाजाची अमूल्य संपत्ती आहे. काही विश्वस्तांनी मनमानी कारभार करत समाजाच्या मालमत्तेचा गैरवापर केला असून समाज आता हे सहन करणार नाही.
जेजुरीतील २३ एकर जागा कोणत्याही परिस्थितीत विकू देणार नाही आणि येत्या दोन वर्षांत याच ठिकाणी समाजासाठी भव्य धर्मशाळा उभारली जाईल. यासाठी स्वतःकडून २१ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.
यावेळी डॉ. रामदास कुटे यांनीही ट्रस्टच्या कारभारावर गंभीर आरोप केले. सुमारे १०० कोटी रुपयांची समाजाची २३ एकर जागा केवळ ९ कोटी रुपयांत विकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून समाजाच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या विकासासाठी, शिक्षणासाठी आणि भाविकांच्या सुविधांसाठी ही जागा वापरण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सभेत उपस्थित समाजबांधवांनी अखिल भारतीय लोणारी धर्मशाळा ट्रस्ट आणि राधाबाई नरळे लोणारी ट्रस्टच्या विद्यमान विश्वस्त मंडळाला तात्काळ बरखास्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. या आंदोलनामुळे जेजुरीत सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून लोणारी समाजाच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठीचा संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
What's Your Reaction?