विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा 'सुरक्षा संकल्प' पोलीस निरीक्षक यादवांनी दिले भविष्याचे धडे
आय मिरर
विद्यार्थ्यांचे सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण हेच उज्ज्वल भविष्यासाठीचे भक्कम पाऊल असल्याचा संदेश देत शिक्रापूर पोलीस स्टेशनने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि शाळा प्रतिनिधींची संयुक्त बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
दि. २४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांची सुरक्षा, विद्यार्थीनींचे संरक्षण, सायबर गुन्हे प्रतिबंध, शाळा परिसरातील कायदा व सुव्यवस्था तसेच शाळा आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
उपस्थित मुख्याध्यापक आणि प्रतिनिधींनी शाळांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, सूचना व अपेक्षा मांडल्या. त्यावर पोलीस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, तक्रार पेटी बसविणे, शाळा परिसरातील संशयास्पद हालचालींवर सतत लक्ष ठेवणे आणि शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनींची छेडछाड, टवाळखोरी अथवा कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेशही यावेळी देण्यात आला.
बैठकीत विद्यार्थिनींना 'गुड टच बॅड टच' विषयावरील जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराची माहिती पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तातडीने देण्याबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले.
विशेष म्हणजे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यापूर्वी ज्या-ज्या पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावली, त्या प्रत्येक ठिकाणी महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय काम केले आहे.
महिला सुरक्षा जनजागृती, बालसंरक्षण अभियान, शाळा-महाविद्यालयांतील मार्गदर्शन कार्यक्रम आणि छेडछाडविरोधी उपक्रमांमुळे त्यांनी संवेदनशील अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.शिक्रापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम त्यांच्या त्याच सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा ठरत आहे.
या बैठकीस सुमारे १०० ते ११० मुख्याध्यापक व शाळा प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकाराचे उपस्थितांनी स्वागत करत पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
What's Your Reaction?