उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये ; दौंड बंधाऱ्यातून 1.17 लाख क्युसेक पाण्याची आवक, भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली
आय मिरर
पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरण अखेर मायनसमधून प्लसमध्ये आले आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून, दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात विक्रमी वेगाने पाणी दाखल होत आहे. त्यामुळे मंगळवारी (8 जुलै) पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातील पाणीसाठा मायनसमधून प्लसमध्ये गेला.
सध्या उजनी धरणात 66.28 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला असून, काही दिवसांपूर्वी सुमारे उणे 15 टीएमसी स्थितीत असलेले धरण आता सकारात्मक पातळीवर पोहोचले आहे. यामुळे शेतकरी, नागरिक तसेच पुणे व सोलापूर जिल्ह्यांतील पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणाकडे 1 लाख 17 हजार 263 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. या प्रचंड प्रवाहामुळे भीमा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत असून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची आवक कायम राहिल्यास उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वेगाने वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील धरणसाखळीतून येणाऱ्या पाण्यामुळे उजनी धरणाला मोठा लाभ होत असून, यंदाच्या पावसाळ्यातील ही अत्यंत दिलासादायक घडामोड मानली जात आहे.
उजनी धरण प्लसमध्ये आल्याने आगामी खरीप हंगाम, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि सिंचन व्यवस्थेला मोठा आधार मिळणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. प्रशासनाने मात्र नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?