उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखी मार्गासाठी १५१ लक्ष मंजूर ; गटनेते श्रीमंत ढोलेंच्या पाठपुराव्याला मोठं यश

Jun 25, 2026 - 22:08
Jun 25, 2026 - 22:17
 0  150
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखी मार्गासाठी १५१ लक्ष मंजूर ; गटनेते श्रीमंत ढोलेंच्या पाठपुराव्याला मोठं यश

आय मिरर 

लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी आणि भाविकांचा प्रवास सुकर करण्यासाठी अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाखेवाडी ते निरनिमगाव या पालखी महामार्ग रस्त्याची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी तब्बल १५१ लक्ष (१ कोटी ५१ लाख) रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या विशेष सहकार्यातून व पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे.

वैष्णवांसाठी आनंदाची पर्वणी...

"ज्ञानदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस ||" या वारकरी परंपरेत संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याला अत्यंत पवित्र आणि अढळ स्थान आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या पाऊलांना या पालखी मार्गावरूनच वाट चालवी लागते. हा केवळ रस्ता नसून भक्तीचा महामार्ग आहे.

वारकरी आणि ग्रामस्थांच्या सुख-सुविधांसाठी पुढाकार...

लाखेवाडी ते निरनिमगाव या मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती. दरवर्षी या मार्गावरून जाणारा पालखी सोहळा, दिंड्या आणि स्थानिक वाहतूक यामुळे वारकरी व ग्रामस्थांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. पालखी सोहळ्या दरम्यान वैष्णवांना उत्तम दर्जाच्या सुख-सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, याकरिता श्रीमंत ढोले यांनी वेळोवेळी वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा केला होता.

त्यांच्या या रास्त आणि भक्तीभावाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून शासन व प्रशासकीय पातळीवर या रस्त्यासाठी १५१ लक्ष रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली.

वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांकडून कृतज्ञता...

श्रीमंत ढोले यांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांना यश आल्यामुळे लाखेवाडी, निरनिमगाव आणि संपूर्ण इंदापूर परिसरातील वारकरी संप्रदायात व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या महत्त्वपूर्ण विकासकामाबद्दल उपमुख्यमंत्री. सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, कार्यकारी अभियंता रामसे आणि इंदापूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता शेंडे यांचे संपूर्ण वारकरी संप्रदाय व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

"संत सोपानकाका महाराज पालखी मार्ग हा लाखो वैष्णवांच्या आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेचा गाभा आहे. वारीच्या वाटेवर चालणाऱ्या माउलींच्या पायाला कोणताही त्रास होऊ नये, हीच आमची प्रामाणिक भूमिका होती. लवकरच या मार्गाचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जाईल." — श्रीमंत ढोले (गटनेते, पुणे जिल्हा परिषद)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow