इंदापूरच्या भिगवण उप बाजारात आडत व्यापाऱ्यांनी बाजार ठेवला बंद ; शेतकऱ्यांची मोठी तारांबळ
आय मिरर (निलेश मोरे)
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उप बाजारात आडत व्यापाऱ्यांनी रविवारी 26 ऑक्टोंबर रोजी अचानक शेतमालाचा निलाव पुकारण्यास नकार दिला.त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. दौंड, इंदापूर, बारामती, कर्जत, करमाळा या तालुक्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांचा माल बाजारात पडून राहिला आहे.
भिगवण उपबाजारात शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी आणला जातो मात्र काल रात्री उशिरा साडेअकराच्या सुमारास व्यापाऱ्यांनी बाजार समितीला शेतकऱ्यांचा शेतमाल आम्ही घेणार नाहीत असा निरोप दिला असा दावा इंदापूर बाजार समितीने केला आहे.
त्यानंतर बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेत त्यांना शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव करण्याच्या करिता विनंती केली. मात्र पाऊस आणि तांत्रिक कारणा देत व्यापाऱ्यांनी माल घेण्यास नकार दिला. असं बाजार समितीचे म्हणणं आहे.खरेदीदारांची मानसिकता होती मात्र व्यापाऱ्यांनी मानसिकता न दाखवल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात पडून राहिला असा दावा ही बाजार समितीचे सचिव संतोष देवकर यांनी केला आहे.
अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या संपामुळे आणखी संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात शेतीमाल साठवण्यासाठी गोडाऊन किंवा झाकलेली जागा उपलब्ध नसल्याने माल खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे भिगवण चा उपबाजार हा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मतदारसंघात आहे.
व्यापाऱ्यांनी अचानक शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शवल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढवलं आहे. कृषीमंत्र्यांनी या प्रकरणात जातीय लक्ष घालावं अशी मागणी आता शेतकरी वर्गाने केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाचे बाजारभाव पाडण्याचे हे व्यापाऱ्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकरी जगला तर व्यापारी जगेन याची आठवण ही व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी करून दिली आहे. मक्याला 2400 हमीभाव असताना ती बाजार पाडून चौदाशे पंधराशे रुपयाने खरेदी करण्याचा व्यापाऱ्यांचा हा डाव आहे असंही शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला काही शेतमाल माघारी नेला आहे तर काही तिथेच पडून आहे. जर त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवायचा असेल तर बाजार समितीने त्याची जबाबदारी स्वीकारली आहे मात्र व्यापारी निलाव करायला तयार नाहीत असे चित्र आहे.
What's Your Reaction?