भीषण अपघातत ट्रॅव्हल्स जळून खाक ; चालकाचा होरपळून मृत्यू झाला...
आय मिरर
समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता. 2) पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रॅव्हल्स बसची ट्रकला धडक बसून भीषण अपघात झाला. धडकेनंतर बसने तात्काळ पेट घेतला.
या दुर्दैवी घटनेत बस चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर बसमधील २९ प्रवाशांनी आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या घेतल्याने त्यांचे प्राण सुदैवाने वाचले आहेत.
नेमकी घटना काय?
मुंबईहून बुलढाण्याकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस (क्र. एमएच 18 सीएक्स 3015)समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवरून जात होती. पहाटे ३ च्या सुमारास चॅनेल क्रमांक ४६३.५ जवळ एका अज्ञात ट्रकने ओव्हरटेक करताना अचानक ब्रेक मारला. यामुळे ट्रॅव्हल्स बसची ट्रकच्या पाठीमागच्या बाजूला जोरात धडक बसली. धडक बसताच काही क्षणात बसने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले.
चालकाचा दुर्दैवी अंत...
अपघात झाला तेव्हा बसमध्ये एकूण २९ प्रवासी होते. प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांनी आपत्कालीन खिडकीचा वापर करून बाहेर धाव घेतली. मात्र, बस चालक अमोल सुरेश शेलकर (वय ३८, रा. खामगाव, जि. बुलढाणा) हे केबिनमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
बचावकार्य आणि उपचार...
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, अग्निशमन विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पोलिसांनी चालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवला. अपघातातील जखमी प्रवाशांनाही तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
What's Your Reaction?