शहा ग्लोबल स्कूलमध्ये वनमहोत्सव उत्साहात साजरा
आय मिरर
शहा ग्लोबल स्कूल, इंदापूर येथे वनमहोत्सवानिमित्त प्री-प्रायमरी व प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि व्यवस्थापन यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेली इको-फ्रेंडली फॅन्सी ड्रेस स्पर्धा सर्वांच्या विशेष पसंतीस उतरली. प्रायमरी विभागातील जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून कल्पक, आकर्षक आणि संदेशप्रधान वेशभूषा साकारली. विद्यार्थ्यांनी झाड, पृथ्वी, फळझाडे, निसर्गमाता, पाणी संवर्धन, स्वच्छ पर्यावरण अशा विविध संकल्पनांवर आधारित वेशभूषा सादर करत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मविश्वासपूर्ण भाषणातून पाणी बचत, वृक्षारोपण, पृथ्वीचे संरक्षण तसेच 'Reduce, Reuse, Recycle (3Rs)' या संकल्पनांचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, पालकांची कल्पकता आणि शिक्षकांचे उत्कृष्ट नियोजन यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले :
ग्रेड १ व २ :
प्रथम क्रमांक – मीरा सागर शिंदे
द्वितीय क्रमांक – हिंदवी प्रशांत उंबरे
तृतीय क्रमांक – ऋत्विज विजय लोंढे
ग्रेड ३, ४ व ५ :
प्रथम क्रमांक – आरव दादा गार्डे
द्वितीय क्रमांक – स्वराली संतोष शेंडे
तृतीय क्रमांक – राजवर्धन नवीनकुमार सावंत
या कार्यक्रमास शाळेच्या व्यवस्थापन सदस्य सौ. रुचिरा शहा प्रमुख उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाचे, पालकांच्या सर्जनशील सहभागाचे तसेच शिक्षकांच्या नियोजनबद्ध आयोजनाचे मनापासून कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच त्यांच्यातील सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होते, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. समीक्षा बुरळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शाळेच्या प्राचार्या वैष्णवी देशपांडे यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत पर्यावरण संवर्धन ही केवळ एक जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात वृक्षारोपण, पाणी बचत, प्लास्टिकचा कमी वापर आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वनमहोत्सवानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजले असून, निसर्गप्रेमाची बीजे त्यांच्या मनात रुजविण्यात शाळेला यश आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?