शिवशाही पलटली,दहा जण दगावले ! वाचा नेमकं काय घटलं
आय मिरर
गोंदियामध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस पलटली.बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा गावाजवळ बस उलटून जवळपास २० फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे या अपघातात बसमधील ८ ते १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मदत कार्य ही केले.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील दिल्या. त्याचप्रमाणे अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेशही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गोदिंयामधील शिवशाही बस अपघातावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट करत अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. ”गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
What's Your Reaction?