अन् पुण्यातून ही नावे निश्चित! मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली
आय मिरर
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्वाधिक जागा मिळवून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यातच चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपुष्टात येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे.
राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा सोपविल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन मंत्रिमंडळामध्ये पुण्यातील तीन जणांची नावे निश्चित झाली असून इतरांनी मंत्रिमंडळात समावेशासाठी जोरदार चढाओढ सुरू केली आहे.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी १८ जागा महायुतीला तर केवळ दोन जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले असून मंत्रिपदावर वर्णी लागावी, यासाठी भाजपसह शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील इच्छुकांनी तयारी केली आहे.
विजयी उमेदवारांची संख्या यंदा वाढली आहे. महायुतीत कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याचा फॉर्म्युला अद्यापही निश्चित झालेला नाही. आपल्या आमदाराला मंत्रिपद मिळावे, यासाठी जुळवणी सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे – पाटील या तिघांची नावे निश्चित मानली जात आहेत.
भाजपच्या तिकिटावर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या पर्वतीच्या माधुरी मिसाळ, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांची तर पिंपरी-चिंचवडमधून भोसरीचे आमदार महेश लांडगे, दौंडचे आमदार राहुल कुल यांची नावे चर्चेत आहेत. यापूर्वी देखील मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मिसाळ यांचे नाव मंत्रिपदासाठी जोरदार चर्चेत आले होते. मात्र अखेरच्या टप्प्यात ते मागे पडले होते. पुण्यातून आमदार झालेल्या त्या एकमेव महिला असल्याने यावेळी त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनील कांबळे हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघातून निवडून आले असल्याने या समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार मंत्रिपदासाठी होऊ शकतो.
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून माजी राज्यमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, यांचे नाव चर्चेत आहे. भरणे हे तिसऱ्यांदा निवडून आले असून त्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे. याबरोबरच पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाला पुणे जिल्ह्यात ताकद वाढविता यावी यासाठी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या शिवतारे यांच्या नावाचा विचार होऊन त्यांना संधी दिली जाऊ शकते.
महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या सर्वच पक्षांतील इच्छुकांनी मंत्रिपदावर संधी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील कोणत्या आमदाराला संधी मिळणार हे निश्चित होणार आहे.
What's Your Reaction?