उद्या भरणेवाडीत पार पडणार मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीर ; आमदार भरणेंनी केलं हे आवाहन

Oct 7, 2023 - 14:34
Oct 7, 2023 - 14:35
 0  306
उद्या भरणेवाडीत पार पडणार मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीर ; आमदार भरणेंनी केलं हे आवाहन

आय मिरर

भरणेवाडी येथे उद्या मोफत ग्रामीण आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इंदापूर तालुक्यातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे.

रविवार दि.०८ ऑक्टोबर रोजी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भरणेवाडी येथील ग्रामपंचायत प्रांगणामध्ये हे शिबिर संपन्न होणार असून भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने या शिबिराची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हे शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश विषद करताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कोरोना महामारी पासून नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे. अलीकडच्या काळात आजारपणाला वयाचे कुठलेही बंधन राहिले नसून तालुक्यामध्ये फिरत असताना असंख्य नागरिक वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेले दिसत आहेत यामध्ये विशेषतः तरुण मुले आणि महिलांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणे - मुंबई सारख्या मोठ-मोठ्या दवाखान्यांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांना महागडे उपचार करणे आवाक्या बाहेरचे बनले आहे.त्यामुळे आपण हे शिबिर आयोजित केले असून यामध्ये ससून रुग्णालयातील नामांकित तज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याकडे येणार आहे यामध्ये नेत्ररोग,डोळे तपासणी व चष्मेवाटप,स्त्रीरोग,मेंदू रोग,कर्करोग,हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार,कान,नाक व घसा तपासणी,ग्रंथीचे विकार,त्वचा व गुप्तरोग, जनरल सर्जरी,लठ्ठपणा, दंतरोग,श्वसनविकार व क्षयरोग,मानसिक आरोग्य, जनरल मेडिसिन,बाल आरोग्य,प्लास्टिक सर्जरी,मूत्ररोग अशा वेगवेगळ्या आजारांवर मोफत तपासणी चाचण्या, औषधोपचार व शस्त्रक्रिया पार पडणार असल्याचे आमदार भरणे म्हणाले.

तसेच या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आभा ओळखपत्र व आयुष्यमान भारत ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी कॅम्प सुद्धा दिवसभर चालणार आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरही पार पडणार आहे.तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार भरणे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow