खासदार सुळेंनी इंदापूरात लक्ष केलं केंद्रीत एकाच महिन्यात तिसऱ्यांदा होतोय तालुक्याच्या दौरा 

Oct 7, 2023 - 07:05
Oct 7, 2023 - 07:09
 0  605
खासदार सुळेंनी इंदापूरात लक्ष केलं केंद्रीत एकाच महिन्यात तिसऱ्यांदा होतोय तालुक्याच्या दौरा 

आय मिरर

2024 च्या लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे इंदापूर तालुक्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज शनिवार दि.०७ ऑक्टोबर रोजी इंदापूर तालुक्याचा दौरा करणारा असून एका महिन्याच्या कालावधीत खासदार सुळेंचा हा तिसरा दौरा आहे.एकंदरीत राजकिय वातावरण पाहता सुळेंनी आत्तापासून जोरदार तयारी सुरु केली असून हक्काच्या समजल्या जाणाऱ्या इंदापूर विधानसभेत लक्ष केंद्रित केल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

२५ सप्टेंबर रोजी खासदार सुप्रिया सुळे इंदापूर शहराच्या दौऱ्यावरती होत्या.यावेळी त्यांनी धो-धो पवासात इंदापूर शहरातील सिध्देश्वर मंदीरात पहिल्या मानाच्या गणपतीचं सह शहरातील इतर गणेश मंडळांना भेटी देत आरती करीत दर्शन घेतले होते. सुप्रिया सुळे यांनी अगदी शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकल्याची चर्चा यावेळी रंगली होती. जेव्हा सुळे इंदापूरचा दौरा करत असतात तेव्हा अगदी बारीक सारीक गोष्टी त्या समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत दोन गट जरी निर्माण झाले असले तरी सुळे यांची मतदार आणि कार्यकर्त्यांशी असणारी नाळ आजही घट्ट आहे.

आज सुळे इंदापूर तालुक्याचा दौरा करणार असून दुपारी पावणे दोन वाजता भिगवण येथे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. मदनवाडी चौकातील व्यंकटेश लॉन्स येथे हा मेळावा होत आहे. पावणे तीन वाजता इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रथम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर वाटप कार्यक्रमासाठी येणार आहेत. दुपारी सव्वा तीन वाजता इंदापूर कोर्टातील बार असोसिएशन कार्यालयास भेट देऊन इमारतीची पाहणी व वकिलांबरोबर चर्चा होणार आहे. सव्वा चार वाजता नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर सुसंवाद. साडेपाच वाजता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर शहरातील मालोजीराजेंच्या ऐतिहासिक गढीची पाहणी करण्यात येईल. सायंकाळी सहा वाजता इंदापूर येथील भिमाई आश्रम शाळेस भेट देणार आहेत. सायंकाळी सव्वा सात वाजता लुमेवाडी येथे होत असलेल्या उरुसाला भेट देणार आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर विधानसभा हा पवारांचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. इंदापूर विधानसभेवर पवार कुटुंबाची मजबूत पकड आहे. 2014 आणि 2019 च्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार भरणे यांच्या रुपाने तालुक्याची सत्ता काबीज करून तालुक्यावर आपला वेगळा होल्ट निर्माण केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत फुटी नंतर आमदार दत्तात्रय भरणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांसह बड्या नेते मंडळींनी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारत अजित पवारांना पाठिंबा दिला. अशात सुळे एकाकी पडल्या की काय अशी चर्चा रंगली होती. याच दरम्यान मागील महिनाभरात सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्याचे दोन दौरे केले.या दोन्हीही दौऱ्यात इंदापूरच्या राजकारणातील दिग्गज समजले जाणारे प्रवीण माने, डाॅ.शशिकांत तरंगे,सागर मिसाळ यांसारखे अनेक कार्यकर्त्यांनी खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व स्वीकारत सुळेंना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि सुळे यांचा तोच दबदबा पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यात दिसून आला.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी कुणाची हा मुद्दा अगदी निवडणूक आयोगापर्यंत जाऊन पोहोचला आहे.त्यावर सुनावण्या सुरू आहेत. निवडणूक निर्णय आयोग नेमका काय निर्णय देणार राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह राहणार की गोठवले जाणार असे एक ना अनेक प्रश्न मतदारांना आहेत.त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ नये म्हणून खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूर तालुक्यावर लक्ष केंद्रित केल्याचं बोललं जात आहे.

इंदापूर तालुक्याने नेहमीच सुप्रिया सुळेंना लोकसभेमध्ये चांगलं मताधिक्य दिलेल आहे. मात्र सध्याचे चित्र पाहिलं तर नेहमीच बहीण म्हणून साथ देणारे हर्षवर्धन पाटील सध्या भाजपमध्ये आहेत.तर दुसरीकडे आमदार भरणे आणि जिल्हाध्यक्ष गारटकरांनी ही अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारलं आहे. उद्या आमने-सामने निवडणुकांची वेळ आलीच तर भरणे आणि गारटकर यांनाही पक्षाचा आदेश पाळावा लागू शकतो.राष्ट्रवादीचा गट महायुतीत असल्याने आणि यापूर्वीच्या निवडणुकांना सहकार्य करणारे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये असल्याने इंदापूर विधानसभेत महायुतीची ताकद मोठी असू शकते.त्यासाठी पूर्वीप्रमाणे मताधिक्य मिळवण्यासाठी सुप्रिया सुळे यांना मोठे कसंब करावे लागणार आहे. 

दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने मिशन बारामती कायम ठेवलं आहे. खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना शह देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच भाजप थेट बारामती लोकसभेत सुळेंच्या विरोधात उतरण्याच्या तयारीत आहे अशा चर्चा रंगू लागल्यात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात युवा मोर्चात मोठे फेरबदल केले आहेत. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्ह्याची जबाबदारी अंकिता पाटील ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. जबाबदारी स्वीकारताच अंकिता पाटील ठाकरे यांनी बारामतीचा दौरा करत बारामती लोकसभेचा 2024 चा खासदार भाजपचा असेल असा पहिलाच दावा केला. त्यामुळे आगामी काळात इंदापूर विधानसभेत आणखीनच राजकारण तापण्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow