पहाटे डोळा लागला, घात झाला अन् त्या अपघातात एक जागीच गेला
आय मिरर
मुंबई गोवा महामार्गावर सध्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढते आहे. वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून मुंबई गोवा महामार्गावर अनेक अपघात घडले आहेत. असाच एक भीषण अपघात कुडाळ येथे झालाय. चालकाला कुडाळ दरम्यान डोळा लागल्याने हा भीषण अपघात झालाय, ज्यात एकाचा जागीच मृत्यू झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडीतील जय अंबे स्वीट मार्टच्या रायका कुटुंबातील रतन प्रकाश रायका (४५, मूळ राजस्थान सध्या रा. सावंतवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथे घडली. दरम्यान यात अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. लादु रायका, साई परब व निलू अशी त्यांची नावे आहेत. ते निपाणी येथे जत्रेसाठी गेले होते. परंतु घराकडे परतत असताना डोळा लागल्याने हा अपघात घडला. त्यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. तर रतन याचा मृतदेह कुडाळ येथे ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
काही वर्षांपूर्वी रतन यांच्या भावाचे इन्सुली घाटीत झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यानंतर या कुटुंबांवर दुसरा आघात झाला आहे. रतन हा इंजिनिअर होता. राजस्थान येथे मायनिंग कंपनीत तो काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो सावंतवाडीत आला होता. त्यानंतर निपाणी येथे जत्रा असल्यामुळे ते चौघे ही ईको गाडीने सोमवारी सायंकाळी त्या ठिकाणी गेले होते.
तिथून परतत असताना हा अपघात घडला. यावेळी नेमकी गाडी कोण चालवत होते याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. रतनच्या पश्चात पत्नी, वडील, आई आणि छोटी मुलगी असा परिवार आहे.
What's Your Reaction?