बिग ब्रेकिंग | रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू ,शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून झाला होता गोळीबार

Jun 29, 2024 - 10:48
 0  2490
बिग ब्रेकिंग | रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू ,शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून झाला होता गोळीबार

आय मिरर

बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत येथे घडली होती. या घटनेतील जखमी रणजीत निंबाळकर यांचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. या घटनेनंतर बारामती, फलटणसह बैलगाडा शर्यत क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी निंबूत येथील ट्रिपल हिंदकेसरी गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्याकडून सुंदर या शर्यतीच्या बैलाची खरेदी केली होती. ३७ लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ठरलेला होता. त्यामध्ये रणजीत निंबाळकर यांना पाच लाख रुपये गौतम काकडे यांनी विसार म्हणून दिलेले होते. उर्वरित रक्कम ही कागदपत्र पूर्ण करून देण्याचे ठरवण्यात आले होते.

गुरुवारी रात्री रणजीत निंबाळकर हे आपली पत्नी व मित्रांसह निंबूत येथे गौतम काकडे यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी रणजीत निंबाळकर यांनी उर्वरीत रक्कम द्या किंवा विसाराची रक्कम घेऊन बैल परत द्या अशी भूमिका घेतली. तर कागदपत्रांवर सह्या करा, तुम्हाला सकाळी पैसे मिळतील असं गौतम काकडे सांगत होते. यातूनच यां दोघांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यावसान गोळीबारात झाले.

बैल कसा नेतो हे बघतोच म्हणत गौतम काकडे यांचे बंधू गौरव यांनी त्यांच्याकडील पिस्तूलातून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. डोक्याला गोळी लागल्याने निंबाळकर जागेवरच कोसळले. त्यांना सुरुवातीला बारामतीत उपचारासाठी नेण्यात आले. मात्र गंभीर परिस्थितीमुळे त्यांना पुण्यात हलवण्यात आले. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रणजीत निंबाळकर यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर बारामती, फलटणसह बैलगाडा शर्यत क्षेत्रातही खळबळ उडाली आहेत. दरम्यान, रणजीत निंबाळकर हे फलटण परिसरात सर या नावाने परिचित होते. ते सैन्य व पोलीस दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवत होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, रणजीत निंबाळकर यांच्या मृत्यूमुळे काकडे कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी आता पोलिसांकडून खूनाचा गुन्हा दाखल होणार आहे. आतापर्यंत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow