'समाजाच्या शेवटच्या घटकाकडूनही घडाळ्याचाच गजर'; सुनेत्रा पवारांची फेसबुक पोस्ट
आय मिरर
लोकसभा निवडणूक होणार अशी चर्चा सुरू झाल्या दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. कारण, इथे पवार विरुद्ध पवार असा घरातलाच सामना रंगण्याची शक्यता आहे. विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दोघी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे.यातील सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाली असून अद्याप महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात सुनेत्रा पवारांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
काय आहे पोस्ट?
माळेगावमधून बाहेर पडल्यानंतर साईनगर येथे रस्त्याच्या कडेला बरेच लोक उभे होते. आधी काहीच कल्पना नव्हती. मात्र तरीही हे लोक बहुदा आपल्यालाच भेटण्यासाठी थांबले असतील अशी शक्यता वाटली आणि गाडी थांबवली. भटके जोशी समाज संघटनेचे ते पदाधिकारी, कार्यकर्ते होते. या समाज बांधवांना मी माळेगावात आल्याचे समजल्याने ते मलाच भेटायला गावात येत होते. मात्र वाटेतच भेट झाली. ही सर्व मंडळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आजपर्यंत कशी मदत झाली ते अगदी भरभरून आनंदी चेहऱ्याने सांगत होते. कोरोना काळात तर दादांनी फक्त त्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या अनेक समाज बांधवांना भक्कम आधार दिल्याचे सांगितले. ते बोलत असताना मी गाडीतून उतरू लागले तर म्हटले, 'नका त्रास घेऊ आत्ता. आम्हाला दादांनी आमच्यासाठी काय केलं तेवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आम्ही सर्वजण तुमच्याच सोबत आहे, रामनवमीच्या कार्यक्रमाला मात्र नक्की यायचं तुम्ही. निमंत्रण घेऊन येतोच', असे आग्रहाने सांगितले. नक्की येईन, असं मनापासून त्यांना सांगितलं आणि निघाले. आज अवघ्या काही वेळात केवढ्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या घटकातील जनतेचे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा यांच्यावरील प्रेम, विश्वास आणि हक्क दिसून आला. दिवसाचे सोळा - अठरा तास हा माणूस अक्षरशः राबतोय, झिजतोय ते कशाप्रकारे रुजलंय याचं दर्शन शेती, उद्योग क्षेत्रात असणाऱ्या चव्हाण कुटुंबियांच्या वस्तीवर झालं, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या माहेरचे वंशज राजे जाधवराव यांच्या वाड्यात झालंच आणि परतताना वाटेत जोशी समाज बांधव भेटून रस्त्यावर देखील झालं. राष्ट्रवादीवरील हे प्रेम व्यक्त केल्याबद्दल भगवान गोंडे, शेखर गोंडे, संतोष सुपेकर, गौरव साळुंखे, अरुण गोंडे, अमर गोंडे, धीरज पवार आदी बंधू, भगिनी या सर्वांचे मनापासून आभार.
सुनेत्रा पवार यांच्या या पोस्टनंतर येथील निवडणूक चांगलीच चुरशीची होईल, असा अंदाज आहे. बारामती हे पवारांचे होमपीच आहे. त्यामुळे येथील मतदारांना दोन्ही पवारांच्या कामाची अगदी जवळून ओळख आहे. त्यामुळेच येथील लढतीचा निकाल काय लागेल, यावर दररोज वेगवेगळे अंदाज लागत आहेत. दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष शिवसेना - एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदार विजय शिवतारे यांनी देखील येथून उमेदवारी घोषित केली आहे, मात्र ते अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आहेत.
What's Your Reaction?