सुळेंच्या पराभवाचा बावनकुळेंना फुल 'कॉन्फिडेंस' म्हणाले २०१९ मध्ये अमेठी व आता २०२४ मध्ये बारामतीचा नंबर

आय मिरर
काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे अमेठी लोकसभा मतदारसंघ हा अभेद्य गड असल्याचे सांगायचे, परंतु आज तेथे भाजपचा खासदार निवडून आलेला आहे. २०१९ मध्ये अमेठी व आता २०२४ मध्ये बारामती मतदारसंघातून भाजपचा खासदार निवडून येईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
दौंड शहरात भारतीय जनता पक्षाच्या ` घर चलो अभियान ` अंतर्गत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यानंतर झालेल्या सभेत बावनकुळे यांनी हा दावा केला.यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघताली राजकीय वातावरण तापणार आहे.
यावेळी पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, कांचन कुल, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, शहराध्यक्ष स्वप्नील शहा, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षात नव्वद वर्षांची कामे झालेली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशाकरिता आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून एक सक्षम नेतृत्वासाठी भाजपला मतदान करावे. मोदींना हरविण्यासाठी २८ पक्षांची एक आघाडी एकत्र झाली आहे परंतु त्या विरोधकांना आगामी निवडणुकीत मतदारच जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात देखील अकरा पक्षांच्या महायुतीचा खासदार निवडून येईल.'
देशभरातील २८ पक्षांच्या आघाडीत तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचा समावेश आहे, परंतु सनातन धर्मासंबंधी द्रमुकचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी वादग्रस्त वक्तव्य करीत हिंदू धर्म संपविण्याची भाषा केली आहे. अशा हिंदू धर्मविरोधी पक्षांच्या आघाडीच्या मुंबईतील बैठकीची व्यवस्था माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली, हे दुर्देव आहे. देव, देश ,धर्म व संस्कृती विरोधी भूमिका घेणार्यांना जनता त्यांची जागा नक्की दाखवून देईल. २२ जानेवारी २०२४ रोजी ज्या राममंदिराची पाचशे वर्षे करोडो लोकांनी वाट पाहिली ते मंदिर निर्माणाचे काम पूर्ण होऊन करोडो लोकांना प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेता येणार आहे.
What's Your Reaction?






