आ.भरणेंना कॅबिनेट मध्ये संधी द्या,इंदापूरातून कार्यकर्ते 'देवगिरी' वर दादांच्या भेटीला

Nov 25, 2024 - 07:41
Nov 25, 2024 - 08:02
 0  779
आ.भरणेंना कॅबिनेट मध्ये संधी द्या,इंदापूरातून कार्यकर्ते 'देवगिरी' वर दादांच्या भेटीला

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूर विधानसभा निवडणूकीत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव केल्यानंतर आ.दत्तात्रय भरणे यांचे अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.आज सकाळी नऊच्या आसपास मुंबईतील देवगिरी निवासस्थानी हे कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी संधी द्या अशी मागणी ते अजित पवार यांच्याकडे करणार आहेत.

2014 मध्ये दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्यातून आमदार म्हणून प्रथम निवडून आले. त्यानंतर झालेल्या 2019 च्या निवडणुकीत ही हर्षवर्धन पाटील यांचा भरणे यांनी दुसऱ्यांदा पराभव केला. सलग दुसऱ्या विजया नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये दत्तात्रय भरणे यांकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती.याशिवाय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे दत्तात्रय भरणे यांकडे होते.मात्र जेमतेम अडीच वर्षे हे सरकार टिकलं आणि त्यानंतर महायुतीचं सरकार राज्यात आलं.

यानंतर 2024 ची विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरली.इंदापूर मध्ये पार पडलेल्या तिरंगी लढतीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्यासह अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा पराभव करत थेट विजयाची हॅटट्रिक मिळवली.

मागील पाच वर्षाच्या कालखंडात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात सहा हजार कोटी रुपयांचा विकास निधी आणला आणि याच विकासाच्या जोरावर इंदापूरकरांनी पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे यांना विधान भवनात पाठवलं. आता नवीन स्थापन होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळात दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी द्या अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.त्यामुळे इंदापूरला कॅबिनेट मंत्रीपद जवळपास निश्चित मानलं जात आहे. कार्यकर्त्यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार नक्की काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेश प्रवक्ते डॉ.शशिकांत तरंगे,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,प्रतापराव पाटील,सचिन सपकळ,बाळासाहेब पाटील,तुकाराम बंडगर,संदेश देवकर, दादासाहेब करगळ,दत्तात्रय घोगरे, पृथ्वीराज ढोले,धनंजय बाब्रस,नवनाथ रुपनवर,शिवाजी तरंगे यांसह इतर कार्यकर्ते मुंबईत देवगिरी निवासस्थानी आज अजित पवारांची भेट घेणार असून इंदापूर साठी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करणार आहेत.

दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी 

दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे खांदे समर्थक आणि अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.सरकार कोणतही असो इंदापूरला नेहमीच लाल दिवा मिळाला,आता ही भरणे यांच्या रुपाने इंदापूरला पुन्हा एकदा लाल दिवा मिळण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे.भरणे यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यास इंदापूरचा विकास आणखी वेगाने होणार असून प्रलंबित प्रश्न देखील अतिजलद मार्गी लागु शकतात,म्हणून लाल दिव्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रही आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow