गोरगरिबांचे पैसे तुम्ही खाल्ले,खर्चाचा हिशोब देत जरांगे पाटलांनी भुजबळांना ठणकावून सांगितलं
आय मिरर
अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला मराठा समाजाने विराट गर्दी केलीय. सभेच्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत हे सांगताना सरकारला फक्त १० दिवस उरल्याचं म्हणत इशारा दिला. तसंच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सभेच्या खर्चावरून केलेल्या आरोपावर मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता जोरदार टीका केली. सभेसाठी ७ कोटींचा खर्च झाला म्हणतात पण आम्ही काय एवढ्या पैशाचं वावर घेतलं का? सात कोटी रुपये खर्च झाला म्हणतात, आम्ही काय वावर घेतलं का? 100 एकर विकत घेतलं नाही. सभेसाठी भाड्याने घेतलंय. यातल्या शेतकऱ्यांनी फुकट घेतलंय. येवून विचारा. गाड्या माझ्या मराठ्यांनी स्वत: खर्च करून लावल्या असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
लोक दहा रुपयेही देत नाहीत असा आरोप करतात यावर जरांगे पाटील म्हणाले, तुम्हाला देत नसतील. ज्या गोरगरिब मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं. आणि तुम्ही पैसे कमावले, पैसे खाल्ले आणि दोन वर्षे बेसन खाऊन आले आतून. आम्हाला शिकवतात पैसे कुठून आले. माझा मायबाप मराठा काबाडकष्ट करतो, शेतात घाम गाळतो, आम्ही घामातून स्वत: निधी जमा केला. १२३ गावांनी पैसा गोळा केला. कापूस विकलेले पैसे हजार, पाचशे रुपये देऊन जमा केले. राज्यातून येणाऱ्या बांधवांची सेवा करण्याचं काम केलं. तुमच्यासारखं नाही आमचं असं म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांचे नाव न घेता टीका केली.
महाराष्ट्रातला मराठा समाज आम्हाला निधी द्यायला तयार होता. पण १२३ गावांना मराठा समाजाची सेवा करायचीय, तुम्ही एक रुपयाही देऊ नका. जर कुणी दिले असतील ना तर मागे घ्या. मधेच खिसेकापू असेल, आम्ही मागितले नाहीत, तुमचे मागे घ्या. २१ लाख रुपये जमा झाले. सात कोटीवाल्याला लगेच हिशोब घे म्हणावं असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
१२३ गावातून २२ गावातल्या लोकांनी पैसे दिले ते २१ लाख झाले. इतर १०२ गावातल्या लोकांनीही पैसे दिले पण ते घेतले नाही. हे आंदोलन पैशांसाठी नाही तर लोकांसाठी आहे. त्याला वावर घ्यायचं येड लागलंय, आपण सभा घेतली तर त्याला वाटलं आपण वावर विकत घेतली. आम्ही कोटी पहिल्यांदाच ऐकलंय. आपण काय बोलतोय कळलं पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तुमच्या पक्षाचे हे जे मंत्री आहेत त्यांना समज द्या. माझ्या नादाला लागले तर मी सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.
What's Your Reaction?