हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते वाढवणार का आ.भरणेंचं टेंन्शन ! दिला "इंदापूर तालुका विकास आघाडी" चा नारा

Jul 26, 2024 - 17:14
Jul 26, 2024 - 17:17
 0  807
हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते वाढवणार का आ.भरणेंचं टेंन्शन ! दिला "इंदापूर तालुका विकास आघाडी" चा नारा

आय मिरर

इंदापूर तालुक्यात विधानसभेचे पडघम वाजण्यापूर्वीचं राजकारण तापलं असून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून इंदापूर तालुका विकास आघाडीचा पॅटर्न समोर येताना दिसतोय…येत्या ऑगस्ट महिन्यात इंदापूर तालुक्यात "इंदापूर तालुका विकास आघाडी" च्या १०० शाखा उघडल्या जाणार असून गावच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून याची तयारी करण्यात आली आहे.खेडोपाड्यातील हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते या शाखा उघडणार आहेत त्यामुळे 2024 च्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचं टेन्शन वाढलं आहे.

गेल्या आठवड्यापूर्वीचं इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून विमान चिन्हावरती अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली ही होती. याच विमानाचे पुनरावृत्ती होणार असे संकेत असणारे निनावी बॅनर इंदापूर शहरात झळकले होते.

कार्यकर्त्यांच्या भावना असतात असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी या बॅनरबाजीला बगल दिली होती.यानंतरच हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावासह इंदापूर तालुकाभर "इंदापूर तालुका विकास आघाडी" असे बॅनर देखील झळकल्याचं पहायला मिळाले.

तोच 10 जुलै रोजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हर्षवर्धन पाटील पायी चालत सहभागी झाले. याचवेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हर्षवर्धन पाटील यांच्या समोरच तुतारी फुंकली. राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असा नारा ही यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर त्यांच्या समर्थकांनी दिला. या सर्व घटनांमुळे इंदापूर तालुक्याचा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

हर्षवर्धन पाटील हे अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करताहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला. हर्षवर्धन पाटील हे भाजपात नाराज आहेत का? अशा चर्चांना ही उधाण आलं. मात्र मी भाजपात नाराज असण्याचे कारण नाही म्हणत सर्व काही ठीकठाक असल्याचा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केला. इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत आमचे नेते निर्णय घेतील, अद्याप या जागे बाबत कोणताही निर्णय झाला नसल्याच हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

तोच आता पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं अपक्षाचं वारं वाहू लागलंय. संपूर्ण इंदापूर तालुक्यात ऑगस्ट महिन्यात इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शेकडो शाखा उघडणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियात वायरल होत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे पुन्हा एकदा विधानसभेचे रणशिंग "इंदापूर तालुका विकास आघाडी" च्या माध्यमातून फुंकतील आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या समोर कडवं आव्हान उभा करतील अशा चर्चांनी जोर धरलाय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow