मित्रानेच काढला मित्राचा काटा ! भिगवण नजिक घडली थरारक घटना

आय मिरर (निलेश मोरे)
भिगवण नजिक मदनवाडी गावच्या हद्दीत 45 वर्ष वयाच्या एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपी मित्राला भिगवण पोलिसांनी अटक केले आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत मोजे मदणवाडी गावातील गायरान माळरानावर मयत विजयकुमार विट्टलराव काजळे, (वय 45, रा. निरगुडे)व त्याचा मित्र राज भगवान शिंदे, (वय 20 वर्षे रा मदनवाडी) हे दोघे रात्री एकत्र बसले होते.
कोणत्यातरी कारणावरून दोन्ही मित्रांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन आरोपी राज शिंदे याने विजयकुमार काजळे याच्या डोक्यात दगड टाकून खून केला.सदर घटनेचा भिगवण पोलिसांनी कसोशीने तपास करून चार तासांच्या आत आरोपीला शोधून काढून ताब्यात घेतले आहे.
सदर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून अधिकचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
What's Your Reaction?






