इंदापूर बस स्थानकातून प्रवासी महिलेचे दागिणे व रक्कम चोरणारी महिला पोलीसांच्या ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीसांची कारवाई 

Mar 12, 2024 - 13:32
 0  2299
इंदापूर बस स्थानकातून प्रवासी महिलेचे दागिणे व रक्कम चोरणारी महिला पोलीसांच्या ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीसांची कारवाई 

आय मिरर (देवा राखुंडे)

इंदापूर एस.टी. स्टँडवर बस मध्ये बसण्याचे बहाण्याने गर्दीचा फायदा घेत प्रवाश्यांचे बॅगेतील सोन्याचे दागिने व रक्कम चोरी करणारी सराईत महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीसांच्या पथकाला ताब्यात घेण्यात यश आले आहे.तिच्याकडून २३५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ०२ मार्च रोजी फिर्यादी अलका वसंतराव बनकर, वय ५९ वर्षे, रा. ताम्हाणेनगर, अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर या पुणे येथे जाणेकरीता इंदापूर एस.टी. स्टँड येथून एस.टी. बस मध्ये बसून पुण्याकडे निघाल्या होत्या. एस.टी. बस मध्ये चढताना त्यांचे बॅगेतील लहान पर्स कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली होती. त्यामध्ये साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८, लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेला आहे. त्याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करणेत आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्ह्याची कार्यपद्धतीचा अभ्यास केला, गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील महिला अश्विनी अवि भोसले रा. माही जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर हिने केला आहे. दि. ०७ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व इंदापूर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने तिला सापळा लावून ताब्यात घेतले.

चौकशीत तिने गुन्हा केल्याची कबुली दिली. तिने एकून तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. यात खेड पोलीस स्टेशन व इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

तिच्याकडून गुन्ह्यांतील चोरी गेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी २३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपी महिलेच्या विरुध्द यापुर्वी जामखेड, करमाळा, हडपसर, पिंपरी पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पो स्टेचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, स्था.गु.शा.चे सहा.पो.नि. योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, इंदापूर पो स्टे चे पो.उप निरीक्षक विवेकानंद राळेभात, स्था.गु.शाखेचे पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजू मोमीण, अतुल डेरे, निलेश शिंदे,इंदापूर पो.स्टेशनचे पोलीस अंमलदार प्रकाश माने, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, गणेश डेरे, निलेश केमदारने, महिला पोलीस अंमलदार रेश्मा जगताप, वंदना भोंग यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow