भिगवणमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ८ लाखांचा ऐवज लंपास
आय मिरर (निलेश मोरे)
बंद बंगल्याच्या गेटवरून चढून प्रवेश करत लोखंडी दार उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडला आहे. भिगवण पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच तीन ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले असून त्यामध्ये एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेनंतर भिगवण परिसरात खळबळ उडाली.
याबाबत कृष्णा नारायण शेंडगे (रा. थोरातनगर, भिगवण ता. इंदापुर जि.पुणे यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी की, दि. १६ व दि. १७ जानेवारीदरम्यान शेंडगे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. दि. १७ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटे बंद बंगल्याच्या गेटवरून चढून आतमध्ये आले. त्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याचे गंठण आणि रोख ४७ हजार रुपये असा एकूण ३ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याचदरम्यान, नीलम प्रकाश देवकाते (रा. थोरात नगर, भिगवण) यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे गंठण, चैन, कानातील रिंगा, चांदीचे जुडवे, आणि ६५ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच परिसरात वास्तव्यास असलेल्या मच्छिंद्र रामगुडे यांचे भाडेकरू संपत हरिदास शेटे (मूळ रा. थेरवडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांची ८० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर (क्र. एम.एच.१६ डी. एल. ७२८६) चोरून नेली आहे.
या प्रकरणी भिगवण पोलिसांनी घरफोडीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील अधिक तपास करत आहेत. दरम्यान, भिगवण पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात चोरट्यांनी एकाच वेळी तीन घरफोडीच्या घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोर या घरफोडीतील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
What's Your Reaction?