बिबट्या निर्दोष ! पुतण्याच निघाला खुनी, दौंडच्या कडेठाण मध्ये काय घडलं होतं ?

आय मिरर
कोणत्या वातावरणात कोण कशी पोळी भाजून घेईल, हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण गावात घडला ज्यामध्ये आरोप लावण्यात आलेला बिबट्या निर्दोष सुटला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील कडेठाण गावात बिबट्यानं धुमाकूळ घातला होता. याचाच फायदा घेत कडेठाण गावच्या उपसरपंचाने शेतगड्याच्या मदतीने स्वतःच्या चुलतीचा खून केला, तिचा मृतदेह उसाच्या शेतात नेऊन टाकला आणि याचा आरोप मात्र बिबट्यावर लावण्यात आला.
बिबट्याच्या हल्ल्यात कडेठाण गावातील लता बबन धावडे यांचा मृत्यू झाल्याचा कांगावा करण्यात आला, एवढेच नव्हे तर नुकसान भरपाई म्हणून वन विभागाकडे लाखोंची मदत मागण्यात आली. मात्र पोलिस आणि वन खात्याच्या कसून तपासामुळे या प्रकरणात बिबट्या निर्दोष सुटला आणि खरा मारेकरी सापडला आहे.
नागपूर येथील प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर मारेकरी हा बिबट्या नसून तो निर्दोष आहे हे सिद्ध झालं आणि त्यानंतर या खुनाचे रहस्य उघडलं. याप्रकरणी यवत पोलिसांनी आता अनिल पोपट धावडे आणि सतिलाल मोरे या दोघांना लता धावडे यांच्या खून प्रकरणी अटक केली आहे.
7 डिसेंबर 2024 दौंड तालुक्यातील कडेठाण गावात एका उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. बिबट्याच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाल्याचा कांगावा करण्यात आला.यानंतर आरोपी अनिल धावडे याने नुकसान भरपाई मिळावी म्हणून वन खात्याकडे लाखोंची मागणी केली.सातत्याने तो याचा पाठपुरावा करत होता, मात्र नागपूर प्रयोगशाळे कडील अहवाल आल्यानंतर मदत देऊ असं आश्वासन वन खात्यान दिलं.अखेर अहवाल आला आणि यात बिबट्या निर्दोष सुटला. यानंतर यवत पोलिसांनी खरा आरोपी शोधला आणि लता धावडे यांच्या मृत्यूचं कोड उलघडलं ! पोलिसांनी आता याप्रकरणी अनिल धावडे आणि सतीराम मोरे या दोघांना अटक केली आहे.
What's Your Reaction?






