अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून राज्यात इंदापूरची ओळख व्हावी - आमदार दत्तात्रय भरणे

Jan 29, 2024 - 08:24
 0  176
अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून राज्यात इंदापूरची ओळख व्हावी - आमदार दत्तात्रय भरणे

आय मिरर(देवा राखुंडे)

महाराष्ट्र असेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या विविध परीक्षांमध्ये अनेक तरुण तरुणींनी घवघवीत यश संपादन केले आहे,या गुणवंतांचा आपल्या तालुकावासियांना रास्त अभिमान असून येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून इंदापूरची ओळख निर्माण झाली पाहिजे,अशी अपेक्षा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

काटी येथील भरतवाडी ग्रीन फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परिक्षेत चमकलेल्या अमोल रामचंद्र मोहिते (पोलिस उपअधिक्षक ),दत्तात्रय सुभाष पाटील (सहकार अधिकारी ) तसेच शिवाजी भारत दोलतोडे (मंत्रालयीन क्लार्क) यांचा सत्कार समारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला होता,या प्रसंगी आ.भरणे बोलत होते.

भरणे म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील अनेक विभूतींनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उतुंग कामगिरी करून आपल्या इंदापूर तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या क्षितिजावर गाजविले असून राजकारण, समाजकारण, शेती, कला, क्रीडा, साहित्य,उद्योग,सहकार आदी क्षेत्रामध्ये इंदापूरची आगळीवेगळी छाप पडलेली असताना अलीकडच्या काळात यामध्ये अधिकाऱ्यांची भर पडली आहे.आपल्या खेडोपाड्यातील अनेक शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवत आकाशाला गवसणी घातली आहे.

खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती व शेतीपूरक व्यवसायावर उपजीविका करत आहे.त्यामुळे आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाण मनामध्ये ठेवून अनेक मेहनती मुले कोणत्याही खाजगी शिकवण्या न लावता दिवस-रात्र स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण करत आहे.याचा मनस्वी आनंद सर्वांना असल्याचे सांगत आमदार भरणे म्हणाले पुढे म्हणाले की,मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ग्रामीण भागातील तरूणांना गावातच वाचनाचे साहित्य तसेच इतर सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत,या भावनेतून सबंध जिल्हाभर शाह-फुले-आंबेडकर ग्राम अभ्यासिका केंद्र उभारण्यात आले होते.याच धर्तीवर अंथुर्णे येथे सुसज्ज वाचनालयाची स्थापना केली असुन या ठिकाणी हजारो तरूण लाभ घेत आहेत.तर शेकडो मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच आघाडी सरकारमध्ये सामान्य प्रशासन विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम करत असताना या कालखंडामध्ये विद्यार्थी हिताचे अनेक धाडसी निर्णय घेतल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो तरुणांना याचा फायदा होऊन आज शासनाच्या विविध विभागांमध्ये अनेक अधिकारी आपलं कर्तव्य बजावत जनतेची सेवा करत असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

वाचनालय उभारण्यासाठी २५ लक्ष निधीची घोषणा…

अलीकडच्या काळात काटी व काटी परिसरातील अनेक तरुण मुला-मुलींनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवल्याची माहिती उपस्थितांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता काटी येथे वाचनालय उभारण्यासाठी २५ लक्ष निधीची घोषणा करत उपस्थितांची वाहवा मिळवली.

या कार्यक्रमास आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह गटविकास अधिकारी विजयकुमार परिट,मार्केट कमिटीचे माजी संचालक साहेबराव मोहिते, हेमंत वाघमोडे,सरपंच अमित मोहिते तसेच ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow