"ज्याच्या चष्म्याचा नंबर वाढलाय, त्याला विकास कसा दिसणार" आ.भरणेंचा हर्षवर्धन पाटलांवर पलटवार

Feb 13, 2024 - 10:51
 0  900
"ज्याच्या चष्म्याचा नंबर वाढलाय, त्याला विकास कसा दिसणार" आ.भरणेंचा हर्षवर्धन पाटलांवर पलटवार

आय मिरर(देवा राखुंडे)

मी जेव्हा 1992 साली छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती संचालक झालो आणि राजकारणाची सुरुवात केली,तेव्हा अंथुर्णे येथील जाफर मुलानी या मुस्लिम समाजाच्या शिक्षकाला पहिली नोकरी देऊनच माझ्या राजकारणाची सुरुवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, रयत शिक्षण संस्था, श्री छत्रपती शिक्षण संस्था, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना यासारख्या आमच्या अधिपत्याखाली असणाऱ्या संस्थांत त्या त्या मेरिट प्रमाणे मुस्लिम समाजाला नोकऱ्या दिल्या आहेत. मात्र ज्याच्या चष्म्याचा नंबर वाढलाय, त्याला विकास कसा दिसणार ? असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावरती केला आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं तसं पुण्याच्या इंदापूर तालुक्यात राजकारण तापू लागल्याचे पाहायला मिळतंय. विकासाच्या मुद्द्यावरुन एकीकडे राज्यामध्ये सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये मात्र स्थानिक पातळीवर रोज आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडतोय.

इंदापूरचे लोकप्रतिनिधी प्रत्येक भाषणात मी विकास केला अशा वल्गना करतात, मी मुस्लिम समाजासाठी भरपूर काम केले आहे असे बोलत भावनिक करण्याचे काम करतात. त्यामुळे माझा लोकप्रतिनिधींना सवाल आहे की तुम्ही इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील किती युवकांना नोकऱ्या लावल्या हे सर्वांसमोर जाहीर करा, असा सवाल सोमवारी दि.१२ फेब्रवारी रोजी उपस्थित करीत आ.भरणे यांना हर्षवर्धन पाटील यांनी एकप्रकारे आव्हान दिले आहे.या आव्हानास आमदार भरणेंनी ही खास शैलीत उत्तर दिलेय.

भरणे म्हणाले की,पंचवीस तीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना ,छत्रपती शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था ,पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ,अनेक खासगी कंपन्या, पी डी सी सी बँक तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांमध्ये असंख्य अल्पसंख्यांक, मागासवर्गीय ,भटक्या विमुक्त जातीच्या तरुणांना नोकरीसाठी आजवर मदत केलेली आहे.तसेच,माझी स्वतःची भरणेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही तालुक्यामध्ये नावाजलेली संस्थाा असून या संस्थेत कर्ज पुरवठा करणारा प्रमुख म्हणून माझा तरुण मुस्लिम बांधव त्या ठिकाणी नोकरी करत आहे.

परंतु आपण जेव्हा एखाद्या अडचणीतल्या माणसाला मदत करतो तेव्हा ती मदत माणुसकीच्या भावनेतून असली पाहिजे,त्यामध्ये कुठेही उपकार केल्याचा अभिर्वाव नसावा हे संस्कार माझ्यावर असल्यामुळे आपण केलेल्या मदतीची कधीच मी जाहीर वाच्यता करत नाही त्यामुळे मी किती मुस्लिम बांधवांना नोकऱ्या लावल्या हे हर्षवर्धन पाटील यांना सांगण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.

भरणे पुढे म्हणाले की, हर्षवर्धन पाटील हे सलग २० वर्ष मंत्री म्हणून काम करत होते.परंतु या कालखंडामध्ये त्यांनी इंदापूर तालुक्यातील मुस्लिम मोहल्ला, मागासवर्गीय वस्त्यांना जाणीवपूर्वक विकासापासून वंचित ठेवले होते.परंतु आपण आमदार झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मुस्लिम समाज बांधवांसाठी अल्पसंख्याक विभागाचा स्वतंत्र निधी आणून प्रत्येक गावातील मुस्लिम मोहल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत.तसेच इंदापूर तालुका विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर आला असून संकुचित प्रवृत्तीच्या मंडळींना आपण केलेला विकास बघवत नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे यंदाही त्यांची राजकीय डाळ शिजणार नाही हे हर्षवर्धन पाटलांनी ओळखले असल्यामुळे नेहमीप्रमाणे कूटनीतीचा अवलंब करत जाती-धर्माचा उल्लेख करून जाणीवपूर्वक तालुक्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आरोपही यावेळी आमदार भरणे केला.

तसेच विकासाच्या बाबतीत बोलण्याचा हर्षवर्धन पाटलांना नैतिक अधिकार उरला नसून त्यांच्या बावडा गावालगत असणाऱ्या लुमेवाडी या मुस्लिम बांधवांच्या मोठ्या गावामध्ये विरोधकांना कधी निधी टाकावसा वाटला नाही.परंतु आपण या गावाला कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे.तसेच इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढी बरोबरच हजरत चांदशवली बाबांच्या दर्ग्यालाही विकास आराखड्यामध्ये कोट्यावधींची तरतूद केली आहे.

त्यामुळे राम रहीम आपल्यासाठी एकच असून सर्वधर्म समभावाची शिकवण आपल्याला आहे.परंतु हर्षवर्धन पाटील यांचा चष्मा तपासून घेण्याची वेळ आलेली आहे.हे केवळ राजकिय स्वार्थासाठी अशी वक्तव्य करत आहेत.त्यामुळे मी ठामपणे सांगतो विकास हा माझ्या रक्तात आहे आणि इंदापूर तालुक्याचा आणि मुस्लिम समाजाचा विकास मी आणि मीच केला आहे होय मीच विकास केलाय असे निक्षून सांगत जे कोणी माझ्यावर टीका करत आहेत त्यांच्याकडे जनतेने दुर्लक्ष करण्याचे आवाहन ही यावेळी आमदार भरणे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow